उस्मानाबाद : तुळजापुरात तुळजाभवानी मंदिरात कलम 144 म्हणजेच, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कालपासून भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्या नेतृत्त्वात तुळजाभवानी मंदिर परिसरात वेबमुदत ठिय्या आंदोलन सुरु होतं. तसेच भाजप आध्यात्मिक आघाडीच्या आंदोलनाचा मंडपही प्रशासनानं काढला होता. परंतु, आता भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने हे आंदोलन स्थिगित करण्यात आलं आहे. आमचा नवचंडीचा यज्ञ होवू दिला नाही. साधुचा तुम्हाला शाप लागेल.सर्व नियम पाळून आंदोलन करत होतो. आम्ही कुणालाही घाबरत नाही. पण भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून आंदोलन स्थगित करत आहेत, असं भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सांगितलं. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडी आग्रही आहे.


तुळजापुरात तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी लागू केल्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. विभागिय दंडाधिकारी सचिन गिरी यांची स्वाक्षरी असलेली ही नोटीस बजावण्यात आली आहे. हिच नोटीस भाजपाच्या अध्यत्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनाही देण्यात आली आहे. त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, जो तुळजाभवानी मंदिर परिसर आहे, तिथून 300 मीटरच्या परिघापर्यंत एकत्र जमता येणार नाही. मंदिर परिसरात जमावबंदी लागू केल्यानंतर परिसर रिकामा करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी तुळजाभवानी परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच तुषार भोसले यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. परवानगी नसताना एकत्रित जमून कोरोनाचा प्रसार करण्यास मदत केली, तसेच मास्क घातला नाही म्हणून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या अध्यत्मिक आघाडीचे बेमुदत ठिय्या आंदोलन तुळजापूर येथे सुरु होतं. आंदोलन स्थळावरील मंडप प्रशासनाने काल रात्री काढून टाकला आहे. तुळजाभवानी मंदिरासमोर नाशिकचे तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु होतं. प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्यासाठी मंडप काढला तरी आज सकाळी रणचंडी यज्ञ आणि आंदोलन पुढे करणार असल्याची भूमिका आधी त्यांनी स्पष्ट केली होती. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करतंय, मात्र त्याला बळी पडणार नाही, जोपर्यंत मंदीरं खुली होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. परंतु आता हे आंदोलन स्थिगित करण्यात आलं आहे.


भाजपाच्या अध्यत्मिक आघाडीच्या वतीने काळा फिती लावून प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलन दडपले म्हणून निषेधकरत असल्याचं भाजपाच्या अध्यत्मिक आघाडीच्या वतीने सांगण्यात आलं. मुघलांपेक्षाही वाईट आणि ब्रिटीशांपेक्षा काळं जे ठाकरे सरकार महाराष्ट्रात राज्य करतंय, याचा निषेध करण्यासाठी आम्ही काळ्या फिती लावल्या आहेत, असं भाजपाच्या अध्यत्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सांगितलं. ते पुढे बोलताना म्हणाले की, 'नवचंडी यज्ञ आम्ही करणार होतो, पण पोलीस प्रशासनानं सर्व साधू संतांना नावानिशी नोटीस दिल्या. तसेच जर तुम्ही कोणताही प्रकार केला तर, तत्काळ अटक होईल आणि गुन्हेही दाखल होतील, असं त्यांना सांगितलं. पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर असलेल्या ठाकरे सरकारचा दबाव वापरून आमचं आंदोलन दडपण्याचा आणि चिरडण्याचा प्रयत्न केला.'


पाहा व्हिडीओ : तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी, भाजप आध्यात्मिक आघाडीचा कालपासून ठिय्या



तुषार भोसले पुढे बोलताना म्हणाले की, 'या सरकारला कोणाविषयी कोणत्याच संवेदना उरलेल्या नाहीत. आज साधुसंतांनाही अटकेची धमकी दाखवली जातेय. पत्रकारही येथे सुरक्षित नाहीत. त्यांनाही अटक करण्यात येत आहे. त्यामुळे जर कोणताही घटक संतुष्ट नसेल तर निश्चितच हे मुघलांपेक्षा आणि ब्रिटीशांपेक्षा वाईट सरकार आहे.'


'माझं आव्हान आहे तुम्हाला आज तुम्ही नवचंडीचा यज्ञ तुळजाभवानी मातेसमोर होऊ दिलेला नाही. तुळजाभवानी मातेची ताकद तुम्हाला दिसेल. हिंमत असेल तर पाच वर्ष सरकार चालवून दाखवा. नाही तुमचं सरकार गडगडलं तर बघा. आजचं आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत, पण आजपर्यंत आम्ही सहिष्णू मार्गाने आंदोलन केलं, शांततेनं केलेलं आंदोलन सरकारने नाकारलं. जर इथून पुढे येथे काही असहिष्णू मार्गाने प्रकार घडले त्यालाही ठाकरे सरकार जबाबदार असेल.', असं तुषार भोसले बोलताना म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले की, 'आमचा नवचंडीचा यज्ञ होवू दिला नाही. साधुचा तुम्हाला श्राप लागेल.सर्व नियम पाळून आंदोलन करत होतो. आम्ही कुणालाही घाबरत नाही. पण भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून आंदोलन स्थगित करत आहोत.'