वाशिम : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात १७ फेब्रुवारी, बुधवारी रात्री मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या सावधगिरीची पावलं उचलत पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखीच परिस्थिती निर्माण करणारे निर्णय घेण्यात येत आहेत.


कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलनं, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका याठिकाणी केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी राहील.


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या या नियमांअंतर्गत पुढील आदेश येईपर्यंत मिरवणूक आणि रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.


Amravati Corona Guidelines| लग्नसमारंभात उपस्थितांची संख्या अधिक असल्यास वधू- वर पक्षावरही फौजदारी गुन्हा


लग्न समारंभांना रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी


लग्न समारंभाकरिता केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थिरत राहता येणार आहे. लग्न समारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असेल. अनुज्ञेय संख्येपेक्षा जास्त संख्येने समारंभासाठी व्यक्ती उपस्थित राहिल्याचे निदर्शनास आल्यास मंगल कार्यालय चालकाविरुद्ध पहिल्या वेळी ५००० रुपये दंड आकारण्यात येईल, दुसऱ्या वेळी अशीच बाब निदर्शनास आल्यास सदरचे मंगल कार्यालय १५ दिवस बंद करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्था याबाबतची कार्यवाही करतील, याकरीता पोलीस आवश्यक सहकार्य करतील.


लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. अन्यथा  (नगरपरिषद/नगर पंचायत /ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेत आवश्यक पथकाचे गठन  करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यांचे स्तरावरून गर्दीस प्रतिबंध करावा. जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालयं, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. या कालावधीत ऑनलाईन, दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील व त्याला अधिक वाव देण्यात यावा अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत.