नागपूर : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफचे एक जवान शहीद झाले आहे. त्यांचे नाव नरेश उमराव बडोले असून ते 49 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत.


गेले अनेक वर्ष सीआरपीएफमध्ये असलेले नरेश बडोले सध्या जम्मू काश्मीर मध्ये वजीरबाग, श्रीनगर येथे तैनात होते. नरेश बडोले आज सकाळी त्यांच्या ड्युटीवर असताना अचानक दहशतवाद्यांनी घात लावून हल्ला केला. तिथे असलेल्या सीआरपीएफ जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर दिले आणि दहशतवाद्यांचा हल्ला अपयशी केला. मात्र, या चकमकीत नरेश बडोले सर्वात पुढे असताना त्यांना गोळी लागली. ते जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.


शहीद जवान नरेश बडोले मूळचे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचे होते. मात्र, सध्या त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य नागपूरला आहे. आज रात्री त्यांचे पार्थिव श्रीनगर वरून दिल्लीला आणि त्यानंतर दिल्लीवरून नागपूरला आणले जाणार आहे. उद्या सकाळी कुटुंबियांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर शासकीय इतमामात नरेश बडोले यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.


नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसह अनेकांनी महाराष्ट्राच्या सुपुत्राला आलेल्या वीर मरणाबद्दल दुःख व्यक्त करत शोकाकुल बडोले कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.