मुंबई : गटारी सगळीकडे जोरात साजरी होताना दिसत आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचं असताना आज मात्र अनेक ठिकाणी त्याचं उल्लंघन होताना दिसलं. पुण्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांना वेळ देण्यात आला. शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे शहरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यात आज गटारीसाठी लोकांकडून पुण्यात चिकन-मटण खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. शहरात आज सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेले पाच दिवस पुण्यातील सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे आज खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली.


पिंपरी चिंचवडमध्येही सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवणारा ठरला. मटण-चिकन आणि मासे खरेदीसाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. खरंतर दिवसभर खरेदीची आज मुभा देण्यात आली आहे, पण आता लॉकडाऊन संपल्याच्या अविर्भावतच काही नागरिक वावरत आहेत.


कोल्हापुरातही आजचा रविवारचा बेत वाया जाऊ नये म्हणून कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केली. मटण आणि चिकन खरेदी बरोबरच मासे खरेदीसाठी देखील नागरिकांनी गर्दी केली. रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे कोल्हापूरकरांचा मांस खाण्याचे हक्काचे दिवस आहे. मात्र पुढचे 7 दिवस लॉकडाऊन असल्याने आजच तांबड्या-पांढऱ्या रस्स्यावर ताव मारण्याचं कोल्हापूरकरांनी ठरवल्याच दिसतं. मटण-चिकण खरेदी करतेवेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.


रत्नागिरीत देखील गटारी अमावस्या जोरात साजरी केली गेली. लॉकडाऊन असलं तरी काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यानं चिकन, मटण खरेदीसाठी दुकानांसमोर गर्दी दिसून येत होती. पण, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा प्रयत्न देखील नागरिकांकडून होताना दिसून आलं. दरम्यान काही ठिकाणी आज चिकन आणि मटनचे दर वाढलेले दिसून आले. काही ठिकाणी मटणाचे दर 700 तर काही ठिकाणी 660 रूपये होते. चिकनच्या दरात देखील 30 रूपयांनी वाढ दिसून आली. जिवंत कोंबडी 150 रूपये किलो दरानं विकली जात होती.