पुणे : कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी लाखो आंबेडकरी बांधव कोरेगाव भीमामध्ये आले आहेत. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.


गेल्या वर्षी झालेल्या कोरेगाव-भीमा दंगलीचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यामुळे यावर्षी अशी कोणती घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. जवळपास साडे सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक सोमवारी रात्रीपासूनच पोहोचले आहेत.

गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली असून छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन यांच्या साहाय्याने परिसरावर नजर ठेवली जात आहे. कोरेगाव भीमा येथे गेल्या वर्षी झालेल्या दंगलीत करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. या दंगलीचे परिणाम देशभरात उमटले होते. त्यामुळे यंदा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. कोरेगाव-भीमामध्ये येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केलं आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री अकरापासून वाहतूक वळवण्यात आली आहे. नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकणकडे वळवली आहेत. नगरकडून हडपसरकडे येणारी वाहने शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा-केडगाव चौफुला-सोलापूर महामार्गावरुन हडपसरकडे वळवली आहेत. पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने चाकण मार्गे किंवा खराडी बाह्यवळण येथून नगरकडे वळवली आहेत.

अशी आहे सुरक्षा व्यवस्था

-  12 एसआरपीएफच्या तुकड्या

- 1 हजार 200 होमगार्ड

-  2 हजार समता सैनिक दलाचे स्वयंसेवक

-   घातपात विरोधी पथक तैनात

- जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट

-  150 पीएमपीएमल आणि खासगी बसेस

- 200 बलून्स

-  300 मोबाईल टॉयलेट

-  जड वाहनांची वाहतूक वळवली

- पार्किंगसाठी 11 ठिकाणं

- रस्त्यांवर बॅरिकेटिंग

-   7 बीडीडीएस टीम्स

-  40 व्हिडीओ कॅमेरे, 12 ड्रोन

-  विजयस्तंभाच्या 7-8 किमी परिसरात 306 सीसीटीव्ही