पंढरपुर : यंदाचं 2021 वर्ष संपत आलं असून सध्या नाताळ सणांसह जोडूनच शनिवार रविवार आल्याने शाळांसह काही नागरिकांना सुट्ट्या मिळाल्या आहेत. त्यामुळे अनेक पर्यटन स्थळांसह देवदर्शनाच्या ठिकाणीही गर्दी होत आहे. दरम्यान पंढरपुरात देखील भाविकांनी तुफान गर्दी केली असून या गर्दीत कोरोना नियमांचा मात्र पुरता फज्जा उडाला आहे. त्यातच ओमायक्रॉनचा (Omicron) धोका वाढू लागल्याने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे आता विठ्ठल मंदिर भाविकांसाठी रात्री 9 वाजता बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे रोज येणाऱ्या हजारो भाविकांना आता केवळ सकाळी 6 ते रात्री 9 यावेळेतच विठुरायाचे दर्शन मिळणार आहे. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची ओढाताण होणार होण्याची दाट शक्यता आहे.


एकीकडे दर्शनाची वेळ कमी झाली आहे. पण दुसरीकडे हजारो भाविक मंदिर परिसर आणि दर्शन रांगेत असताना प्रशासनाकडून ही जास्त काळजी होत नसल्याचं दिसून येत आहे. विठ्ठल मंदिर परिसरात आणि नामदेव पायरी भागात सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला असून शेकडो भाविकांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसत नाहीये. सध्या देशभर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना पुन्हा लॉकडाऊन होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पण अशावेळी पंढरपुरसारख्या ठिकाणी होणारी तुफान गर्दी प्रशासनाची डोकेदुखी वाढवू शकते. दरम्यान या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha