उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्याला केंद्र सरकारने सुरक्षा देण्याची योजना जाहीर केल्याची टीका शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. गोऱ्हे तुळजापूर इथे बोलत होत्या. कंगना रनौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी असल्याचं त्या म्हणाल्या. ज्या व्यक्तींना संरक्षण हवे आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांवर बोला, टीका करा आणि वाय दर्जाची सुरक्षा मिळवा," अशी योजना सुरु आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं.


दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुरक्षेची गरज नसल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. विकासाच्या प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मशिदीवरील भोंगे तसंच हनुमान चालीसा पठण हा मुद्दा समोर आणला असून हा प्रश्न प्रतिष्ठेचा करु नये, असा सल्लाही नीलम गोऱ्हे यांनी  राज ठाकरे यांना दिला. तसंच तर पक्षाने आदेश दिल्यास आपण अयोध्येला जाऊ, असंही त्या म्हणाल्या.


धाराशिव आणि संभाजीनगर नामांतराबाबत केंद्राची दुटप्पी भूमिका : नीलम गोऱ्हे 
उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे संभाजीनगर हे नामांतर करण्यासाठी अनेक ठराव शिवसेनेने मांडले. मात्र केंद्र सरकारच्या दुजाभाव आणि दुटप्पी भूमिकेमुळे हे नामांतर होत नसल्याची टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली. नामांतर करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. नामांतर ही लोकभावना असून दिल्लीतील रस्त्याची नामांतर होतात तसंच हैद्राबादचे भाग्यनगर हे नामकरण होतं, मात्र महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला जातो, असा आरोप त्यांनी केलं. तसंच केवळ राजकारणासाठी भाजपचे हिंदुत्व आहे, अशी टीकाही गोऱ्हे यांनी केली.


केंद्राकडून सुरक्षा हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण : गृहमंत्री
दरम्यान राज्यातील अनेक नेत्यांना मिळालेल्या केंद्राच्या सुरक्षेवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नागपुरातील पत्रकार परिषदेत भाष्य केलं होतं. केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचं मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं. "राज्य सरकार नियमांनुसार सुरक्षा पुरवत असतं, राजकीय निर्णय नसतो," असंही ते म्हणाले. 


नवनीत राणा यांना वाय दर्जाची सुरक्षा
अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहामंत्रालयाद्वारे वाय प्लस श्रेणी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. राणा या सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात भूमिका लोकसभेत उचलत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आहे. यानंतरच त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार वाय प्लस श्रेणी सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. 


राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना केंद्रीय सुरक्षा 
नवनीत राणा यांच्या याआधी केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना रनौतला वाय प्लस सुरक्षा पुरवली होती. कंगनाने राज्य सरकारविरोधात भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत अनेक नेत्यांना तरुंगात टाकण्याचा इशारा देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना ही केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे. सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.


संबंधित बातम्या


Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी; केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?


केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण : दिलीप वळसे पाटील


नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, केंद्रीय गृहामंत्रालयाने पुरवली 'वाय प्लस' सुरक्षा