सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाउन असताना देखील भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ विनापास मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याला जात होता. मात्र, आंबोली पोलिसांनी ई पासची विचारणा केली असता पृथ्वी शॉ जवळ कोणत्याही प्रकारचा पास नव्हता. त्यामुळे आंबोली पोलिसांनी आधी पास दाखव, मगच पुढे जा असे सांगितल्याने पृथ्वीचा गोंधळ उडाला. अखेर ऑनलाईन पास काढून पृथ्वी गोव्याकडे मार्गस्थ झाला. मुंबईहून प्रवास करताना पृथ्वीला कुठेही पास विचारण्यात आला नाही. मात्र, आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे एका सेलिब्रिटी क्रिकेटरला एक तास आंबोलीत थांबून राहावे लागले.


भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा मित्रासोबत मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याकडे जाण्यास निघाला होता. त्याची कार काल सकाळी साडे अकराच्या सुमारास आंबोली पोलीस दुरक्षेत्राजवळ आली असता आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी ई पास तपासणीसाठी मागितला असता त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याचे सांगितले. त्यामुळे आंबोली पोलिसांनी पास शिवाय जाता येणार नाही असे सांगत पोलिसांनी त्याला तिथेच थांबवले. पृथ्वी शॉने आंबोलीतूनच ऑनलाईन पध्दतीने ई पाससाठी अर्ज केला. त्यानंतर एक तासाने त्याचा पास तयार होऊन मोबाईलवर आल्यावर तो पास आंबोली पोलिसांना दाखवून गोव्याकडे मार्गस्थ झाला. 
 
वाधवान बंधू हे मंत्रालयातून विशेष पास मिळून मुंबईवरुन महाबळेश्वरला फिरायला गेले होते. याची आठवण या प्रकरणावरुन झाली. येथे मात्र आंबोली पोलिसांनी सर्तकता दाखवत पृथ्वी शॉला विनापास प्रवास करण्यापासून रोखले आणि ई पास काढण्यास भाग पाडले.