Maharashtra Coronavirus Update : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे आहे. ओमायक्रॉन आणि त्याच्या सब व्हेरियंटच्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.86% एवढा आहे.


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात चार हजार 255 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी राज्यात 4024 रुग्ण आढळले होते. त्यातुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासात 2879 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्ताची संख्या 7755183 इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 97.87% एवढे झाले आहे. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २० हजारांच्या पार
 
मुंबईने चिंता वाढवली, 70 टक्के सक्रिय रुग्ण -
राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात 20 हजार 634 सक्रिय रुग्ण झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांमध्ये मुंबईतील 70 टक्के रुग्ण आहेत. मुंबईत सध्या 17 हजार 5 सक्रिय रुग्ण आहेत. त्याशिवाय ठाणे 3978 आणि पुणे 1453 सक्रीय रुग्ण आहेत. या तीन शहरात सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे आहे. 


सर्वाधिक रुग्ण मुंबईत - 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 4255 नव्या रुग्णांची नोंद जाली आहे. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत आज 2366 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय ठाणे मनपा 374, नवी मुंबई मनपा 383, वसई विरार मनपा 122, पनवेल मनपा 127, पुणे मनपा 194 कोरोना रुग्ण आढळले आहेत. इतर ठिकाणी नव्या कोरोना रुग्णांची सख्या 100 च्या आत आहे. नंदूरबार, सांगली मिरज कुपवाड मनपा, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या ठिकाणीही एकाही कोरोना रुग्णांची नोंद नाही. 


राज्यात बी ए.5 व्हेरीयंटचे आणखी 2 रुग्ण -
 भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, (नीरी) नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर येथे बीए. 5 व्हेरियंटचे 2 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक रुग्ण 29 वर्षीय पुरुष असून दुसरा रुग्ण 54 वर्षाची महिला आहे. त्यांनी मागील आठवडयात  अनुक्रमे केरळ आणि मुंबई येथे प्रवास केला आहे. दिनांक 6 आणि 9 जून 22 रोजी ते कोविड बाधित आढळले होते.  या दोघांचेही लसीकरण झालेले असून हे दोन्ही रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.4 आणि बीए.5 रुग्णांची संख्या 19झाली आहे.