मुंबई : कोरोना संसर्गाची तिसरी लाट आल्यास त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असं सांगितलं जात आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होण्याचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. बीड जिल्ह्यात दुसर्‍या लाटेत अवघ्या तीन महिन्यात 4 हजार 800 मुलं कोरोनाबाधित झाली आहेत. तर औरंगाबादमध्ये पाच महिन्यात 4 हजार 981 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होण्याचं प्रमाण साडेतीन महिन्यातच दुपटीहून अधिक आहे.


कोणत्या जिल्ह्यात किती मुलांना कोरोनाची लागण?


*नंदुरबार
1 मार्च 15 मे दरम्यान 3 बालके कोरोनाबाधित होते, उपचारानंतर बरे होऊन घरी परतले.


*बुलढाणा 
पहिल्या लाटेत एकाही बालकाला कोरोनाची लागण झाल्याची नोंद नाही. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात दोन बालकांना कोरोनाची लागण झाली होती. दोन्ही बालकांनी कोरोनावर मात केली आहे.


*जळगाव
कोरोनाच्या पाहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 15 वर्षांखालील 8 हजार 400 बालकं बाधित झाली आहेत. यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.


*पालघर
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 15 जुलै 2020 पर्यंत दहा वर्षांखालील 138 मुलांना कोरोनाची लागण झाली. तर दुसऱ्या लाटेत 1 मार्च 2021 ते 15 एप्रिल 2021 दरम्यान दहा वर्षांखालील 237 मुलं कोरोनाबाधित झाले. त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला.


*वाशिम
अद्याप प्रशासन दरबारी एकाही बालकाला कोरोनाची लागण झाल्याची नोंद नाही


*सोलापूर
दुसऱ्या लाटेत 0 ते 15 वर्षे वयोगटातील 8 हजार 280 बालकांना बाधा झाली. त्यातील 3 बालकं दगावली. 


*बीड
बीडमध्ये पहिल्या लाटेत 19 हजार जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये 1 हजार 88   बालकांचा ज्यांचे वय 14 वर्षाच्या खाली आहे त्यांचा समावेश होता.तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आले. केवळ 79 दिवसात 4 हजार 800 बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळतं आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 14 वर्षाच्या खालील तब्बल पाच हजार 889 बालकांना कोरोनाची लागण झाली आहे.


*कोल्हापूर 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 0 ते 1 वयोगटातील 57 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 01 ते 10 वयोगटातील 1897 बालकं कोरोनाबाधित झाले. दुसऱ्या लाटेत 0 ते 1 वयोगटातील 105 बालकं कोरोनाबाधित झाली. तर 01 ते 10 वयोगटातील 1 हजार 684 जण कोरोनाबाधित झाले. 0 ते 10 वयोगटात एकूण 3 हजार 743 कोरोना रुग्ण आहेत. दोन्ही लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात 0 ते 18 वयातील एकाही बालकाचा मृत्यू नाही.


*औरंगाबाद  
पहिल्या लाटेत (मार्च ते डिसेंबर) 0 त 5 वयोगटातील 559 मुलं कोरोनाबाधित होते. तर 5 ते 18 वर्ष वयोगटात 3 हजार 545 जणांना कोरोनाची लागण झाली होती. म्हणजेच 0-18 वर्षे वयोगटातील एकूण 4 हजार 104 जणांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत (जानेवारी ते 20 मे) 0 ते 18 वर्ष वयोगटातील 4 हजार 981 जणांना कोरोनाची लागण झाली. म्हणजेच पहिल्या लाटेत 10 महिन्यात 4 हजार 104 मुलं बाधित होती तर दुसऱ्या लाटेत अवघ्या 5 महिन्यात 4 हजार 981 मुले बाधित झाली आहेत.


*नाशिक
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होण्याचं प्रमाण साडेतीन महिन्यातच दुप्पटीहून अधिक आहे. 27 मार्च 2020 ते 15 मार्च 2021 दरम्यान 0 ते 12 वयोगटातील एकूण 6 हजार 121 मुलं कोरोनाबाधित होते. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला. तर 16 फेब्रुवारी 2021 ते आजपर्यंत  0 ते 12 वयोगटातील तब्बल 12 हजार 282 मुलांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एका बालकाचा मृत्यू झाला.


*धुळे
कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून मंगळवारपर्यंत 41 हजार 823 बाधित आढळून आले आहेत. त्यात 0 ते 17 वयोगटातील रुग्णांची संख्या 2 हजार 453 होती. दुसऱ्या लाटेत 0 ते 17 वर्षे वयोगटातील 120 मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे