बीड : संत जगमित्र नागा सूतगिरणीकडील थकीत कर्जामुळे धनंजय मुंडे यांच्या आणि इतर संचालकाच्या मालमत्तेवर ते अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने यापूर्वी टाच आणली होती. आज कोर्टाने या निर्णयाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळालेला आहे. अंबाजोगाई न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या एका निकालात संत जगमित्र सुतगिरणी संदर्भात सूतगिरणीच्या व संचालकांची अर्जात नमूद केलेली मालमत्ता विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही, असे म्हटले होते. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी याच कोर्टात अर्ज करुन या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली होती. सदर कारवाई करताना काही विशिष्ट लोकांवरच कारवाई करण्यात आली, गृहमंत्रालयाकडून याबाबत घ्यावयाची परवानगी कायद्याला अभिप्रेत संज्ञेप्रमाणे न केल्यामुळे तसेच या प्रकरणी कोणतीही नोटीस न मिळाल्याने संपत्तीवर टाच आणण्याच्या निर्णयास स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच हा आदेश एकतर्फी असल्याचेही म्हटले होते. अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेऊन, तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक व सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेत न्यायालयाने संपत्तीवर टाच आणण्याच्या दिलेल्या निकालासंबंधी सदर अंमलबजावणीस स्थगिती देत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.