Nitesh Rane Case :  भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. मागील दोन दिवसांपासून कोर्टात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. नितेश राणे यांचे वकील आणि सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली आहे. नितेश राणे यांनी शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे. मागील तीन दिवसांपासून नितेश राणे हे अज्ञातवासात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 


नितेश राणे यांना प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा दावा त्यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी कोर्टात केला. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि नितेश राणे यांचा काहीही संबंध नसल्याचेही अॅड. देसाई यांनी सांगितले. तर, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे हे पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील घरत यांनी सांगितले. सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील यांच्यात खडाजंगी झाली. याप्रकणी सरकारी वकील हे वेळ काढण्याचे काम करत असल्याचा आरोप नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत, आमच्याविरोधात तक्रार का केली नाही? असा सवालही नितेश राणेंच्या वकिलांनी केला याआधी कोर्टाने नितेश राणे यांना अंतरीम अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज त्यांच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही नोटीस


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी बुधवारी नोटीस पाठवली आहे. कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून आमदार नितेश राणे यांच्याबाबतची माहिती देण्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र ते पोलिसात हजर झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे. त्याबाबत नारायण राणे यांना मंगळवारी पत्रकारांनी विचारलं असता, नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का असं म्हटलं होतं. त्यावरुनच आता कणकवली पोलिसांनी नोटीस पाठवून नारायण राणे यांनी नितेश राणे यांची माहिती द्यावी असं म्हटलं आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपण अत्यंत व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नसल्याचे कणकवली पोलिसांना कळवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच आपण आणखी दोन-तीन दिवस व्यस्त असणार असून त्या नंतरच आपण चौकशीला येऊ शकतो. आपण कॉन्फरन्सवर जबाब नोंदवू शकता, असेही राणे यांनी पोलिसांना बुधवारीच कळवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.