अमरावती : जलयुक्त शिवार योजनेवरुन शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप आणि मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.


“जलयुक्त शिवार योजना लोकांसाठी चांगली आहे. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमणात जबाबदार अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे. प्रामुख्याने वनविभागाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुख्यमत्र्यांनी चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे.”, असे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले.

“या सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे थेट राज्यपालांना दिले आहेत. याची तक्रारसुद्धा केली आहे. येणाऱ्या काही काळात जर यामध्ये कारवाई झाली नाही, तर आंदोलन करु.”, असा इशाराही खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.