परभणी : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत  असल्याने त्यांना दोन वेळचे अन्नधान्य देण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. दुसरीकडे मात्र परभणीत चक्क एका नगरसेवकाच्या मुलाने तहसीलमध्ये बसून तब्बल 700 बोगस शिधापत्रिका तयार करुन घेत धान्य वाटप करण्याचा प्रकार परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उघडकीस आणला. खासदार संजय जाधव यांनी या प्रकरणी तहसीलदारांची तक्रार थेट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


परभणी तहसील कार्यालयात काल (24 एप्रिल) रात्री बसून एका नगरसेवकाच्या पुत्राने त्यांच्या प्रभागातील आणि इतर परिसरातील तब्बल 700 जणांच्या नावाने शिधापत्रिका तयार करुन घेत असल्याची बाब खासदार संजय जाधव यांना समजली. त्यावेळी खासदारांनी त्याचे फोटो आणि माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठवत तात्काळ याची चौकशी करण्याची मागणी केली. अशा आपत्कालीन परिस्थितीत तहसीलमध्ये गैरप्रकार होत असतील तर सामान्य नागरिकांनी जायचे कुणाकडे असा सवाल त्यांनी विचारला. तसंच तहसीलदार विद्याचरण कडावकर यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे परभणी तहसील कार्यालयात आपत्ती निवारण्याचे काम सुरु आहे की गैरप्रकार करण्याचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.



तक्रार आल्याने चौकशी सुरु केली : जिल्हाधिकारी मुगळीकर
याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी आम्ही संवाद साधला असता त्यांनी माझ्याकडे तक्रार आली असून त्याची चौकशी सुरु केली असल्याचे एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.


कुठलाही गैरप्रकार झाला नाही : तहसीलदार कडावकर
परभणी तहसील कार्यालयात कुठल्याही प्रकारच्या बोगस शिधा पत्रिका आम्ही दिल्या नाहीत. हा सर्व गैरसमज करण्यात आला असून माझ्याविरोधात हे षडयंत्र असल्याचे प्रतिक्रिया परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी फोनवरुन दिली आहे.