Maharashtra Lockdown: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळं काही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं मत हायकोर्टानं देखील व्यक्त केलं होतं. आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मेडिकल आणि आरोग्य सुविधांशी संबंधित कामं वगळता सर्व गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये निर्बंध वाढवण्याचा निर्णय
राज्यामध्ये लॉकडाऊन चालू असला तरी बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वीच कडक निर्बंध लादण्यात आले होते. आता पुन्हा एकदा हे निर्बंध वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी 5 मे ते 7 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यात अनेक अत्यावश्यक सेवांवरही बंधने घालण्यात आली होती. आज या कडक लॉकडाऊनचा अंतिम दिवस होता. मात्र, हे कडक लॉकडाऊन 12 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा जिल्हा प्रशासनाची कडक लॉकडाऊनची घोषणा
सातारा जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे सातारा जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊनची घोषणा केली असून याची अंमलबजावणी आज मंगळवारपासून सुरु झाली आहे. मेडिकलची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.राज्यभर अंशत: लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही कोरोनाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत होती. गेल्या आठवडाभर दररोज सुमारे 2 हजार 500 च्या आसपास कोरोना बाधितांची नोंद होताना पाहायला मिळत होती. तर गेल्या आठवड्यापासून बाधित मृत्यूंचा आकडाही दिवसेंदिवस वाढतानाचे चित्र दिसत होते. गेल्या आठवड्यात तब्बल 16 हजार 763 कोरोना बाधितांची नोंद झाली. तर जवळपास 500 च्या आसपास बाधितांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत कडक लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत असंख्य सातारकरांचे होते. सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आल्यानंतर प्रभारी जिल्हा दंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी काल आदेश काढून आजपासून सात दिवसाचा कडक लॉकडाऊनचा आदेश देण्यात आला.
सांगलीत आठ दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा
सांगली : राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू असतानाच आता सांगलीत हे निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहे. खुद्द पालकमंत्री जयंत पाटील यांनीच जिल्ह्यात आठ दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा पाहता ही साखळी तोडण्यासाठीच हा निर्णय घेतला जात असल्याचं म्हणत त्यांनी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 ते 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सुरू असलेल्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवा देखील 8 ते 15 पर्यंत बंद असतील. या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहतील अशी घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. 8 मे रात्री 8 ते 15 मे सकाळी 7 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
वाशिम :वाशिम जिल्ह्यात 9 मे पासून 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. किराणा, भाजीपाला, फळ आणि दूध घरपोच सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहतील. फक्त आरोग्य सेवा वगळता घराबाहेर पडल्यास होणार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दिले आहेत.
यवतमाळ : कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन कडक निर्बंध केले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जाहीर केले आहेत. 9 मे च्या सकाळी 7 वाजता पासून 15 मे च्या सकाळी 7 पर्यंत कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवेचे कार्यालय वगळता सर्व खासगी शासकीय निमशासकीय कार्यालये बंद राहतील. 25 लोकांना उपस्थित मध्ये लग्न परवानगी, मात्र तशी परवानगी तहसीलदार यांच्या कडून घेणे आवश्यक असेल.
अकोला : संपूर्ण अकोला जिल्ह्यात 9 मे सकाळी 7 वाजतापासून ते 15 मेला सकाळी 7 वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असेल. सार्वजनिक आणि खाजगी दवाखाने, मेडीकल दुकाने, महत्वाची कार्यालये वगळता सर्व सेवा बंद राहतील. दुध वितरण व्यवस्थेला सकाळी आणि संध्याकाळी 6 ते 8चा वेळ दिला आहे. रेस्टॉरंट, हॉटेलची पार्सल व्यवस्था फक्त घरपोच असेल. जिल्ह्याच्या सीमा सील होणार असल्याची माहिती आहे.
बदलापुरात शनिवारपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन
बदलापूर शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता बदलापूर मध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, तसंच सगळ्या विभागांचे अधिकारी, पोलीस यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये लॉकडाऊन प्रभावीपणे लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याबाबत बदलापूर नगरपालिकेने कडक लोकडाऊन लावण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना धाडला होता .आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्याने उद्या 8 तारखेपासून 15 एप्रिलपर्यंत बदलापूर शहरात कडक लॉकडाऊन असणार आहे .या कालावधीमध्ये बदलापूरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकानं आठ दिवसांसाठी काटेकोरपणे बंद राहतील. दूध, फळे भाजीपाला, किराणा या दुकानदारांना फक्त होम डिलिव्हरी देता येईल. अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कडक स्वरूपाची कारवाई केली जाईल. तर मेडिकल आणि दवाखाने मात्र सुरू राहतील.