मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशातच अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत. तसेच रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनचीही मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा 80 टक्के आणि औद्योगिक वापरासाठी 20 टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती 30 जूनपर्यंत राज्यभरात लागू राहणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
राज्यातील ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार आरोग्य विभागाने राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण ऑक्सिजन पैकी 80 टक्के वैद्यकीय वापराकरीता तर उर्वरित 20 टक्के औद्योगिक वापराकरीता पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्यायचे असून वैद्यकीय क्षेत्राला 80 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचा असे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.
कोरोना रुग्णांना बेड मिळाला नाही, तर थेट मला फोन करा, मी बेड देईनच : इकबालसिंह चहल
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि उपलब्ध बेड्सची संख्या यांचा ताळमेळ बिघडला आहे. कोरोना रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी येत असताना बेड मिळाला नाही, वॉर्ड वॉर रुमकडून फोन आला नाही तर थेट मला फोन करा, मी बेड देईनच असे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह यांनी दिलं आहे. पुढच्या काही दिवसांत दरदिवसाची रुग्णसंख्या 10 हजारांवर जाईल. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येसाठी बेड व्यवस्थापनाची साखळी पुन्हा एकदा सक्रीय करणार असल्याचंही महापालिकी आयुक्तांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- BMC Guidelines | कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून गाईडलाईन्स जारी
- राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...
- उद्धवजी अडचण अशी आहे की... ; आनंद महिंद्रांकडून लॉकडाऊनच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला
- कोरोना रुग्णांना बेड मिळाला नाही, तर थेट मला फोन करा, मी बेड देईनच : महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल