मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 15 हजार 51 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 48 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 52 हजार 909 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 2.27 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यांत एकूण 1 लाख 30 हजार 547 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आज 10 हजार 671 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजपर्यंत 21 लाख 44 हजार 743 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 92.07 टक्के एवढा आहे. 


नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. आज नागपुरात 2 हजार 297 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आज दिवसभरात 1409 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून आज 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशकातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ आहे. दिवसभरात जिल्ह्यात 1376 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृतांचा आकडा 2176 वर पोहोचला असून सध्या 8 हजार 867 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. 



लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर करणार : आरोग्यमंत्री 


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली.  मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केले. राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 


संसर्गाचे प्रमाण वाढू नये यासाठी नियम पाळणं गरजेचं : आरोग्यमंत्री 


राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :