मुंबई :  मुंबई महापालिकेकडून कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीकडे मुंबई,  दिल्लीतील दोन वेगवेगळे कोविड रिपोर्ट  मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने ट्वीट करत माहिती दिली आहे. 


'के पश्चिम' विभागाअंतर्गत ओशिवरा परिसरात राहणाऱ्या एका चित्रपट अभिनेत्रीवर कोविड विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चित्रपट अभिनेत्रीस कोरोनाची बाधा झालेली असतानाही ती सार्वजनिक परिसरांमध्ये वावरली एवढचं नव्हे तर तिने चित्रीकरणांमध्येही भाग घेतला. परिणामी कोरोनाचा संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकेल, अशा प्रकारची कृती केल्यामुळे आणि कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच  महापालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.  


 






या अभिनेत्रीकडे मुंबई आणि दिल्लीतील कोविडचे दोन वेगवेगळे रिपोर्ट आढळले आहेत. 11 मार्चचा मुंबईतील रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना 12 मार्चचा दिल्लीतील निगेटिव्ह रिपोर्ट  दाखवून बाहेर फिरत असल्याचे उघड झाले. त्यामुळे, मुंबईतील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असतांनाही   दिल्लीचा प्रवास केला की, दिल्लीचा कोविड निगेटिव्हचा खोटा रिपोर्ट दाखवला याबाबत तपास सुरु आहे. पॉझिटिव्ह असतांना देखील ओशिवरा भागात अभिनेत्री फिरत होती. स्थानिकांनी तशा तक्रारी देखील केल्या होत्या.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पश्चिम' विभागाच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांद्वारे या बाबत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 269, 270  आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम 2 आणि 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 


पोलिस तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार चित्रपट अभिनेत्री यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. चाचणीनुसार अभिनेत्रीला कोरोनाची बाधा झाल्याचे 11 मार्च 2021 ला निष्पन्न झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरातच विलगीकरण पद्धतीने राहणे बंधनकारक असताना, नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक परिसरातील वावर सुरू ठेवल्याचे समोर आले आहे.   के पश्चिम विभागातील आरोग्य खात्याचे कर्मचारी 14 मार्चला संध्याकाळी उशीरा  घरी गेले असता वारंवार विनंती करूनही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासही अभिनेत्रीने नकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर परिसरातील एका समाजसेवकांच्या मदतीने अभिनेत्रीला विनंती केली असता दरवाजा उघडला. ज्यानंतर विलगीकरणाचा शिक्का  हातावर नियमानुसार उमटविण्यात आला. 


 चित्रपट अभिनेत्री कोरोनाबाधित असूनही सार्वजनिक परिसरांमध्ये वावरणे, चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सहभाग घेणे आणि परिणामी इतर लोकांना कोरोनाचे संसर्ग होऊ शकेल आणि प्रादुर्भाव वाढू शकेल असे कृत्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांद्वारे त्यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


संबंधित बातम्या :