मुंबई : सध्या देशासह राज्यातही कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. अशातच कोरोना संदर्भात अनेक अफवा पसरत आहेत. कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने सांगूनही अफवा काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. व्हॉट्सअॅपवर कोरोनाच्या रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही हॉस्पिटल्सची यादी व्हायरल झाली आहे. परंतु ही यादी खोटी असून कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.



महाराष्ट्र डिजीआय पीआरच्या ऑफिशिअल फेसबुक आणि ट्विटर हॅन्डलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र डिजीआय पीआरच्या अकाउंटवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये 'कोरोनासाठी संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही, रुग्णाचा घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो, त्यामुळे #कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांच्या यादीचा व्हायरल मेसेज खोटा; आरोग्य विभागाचा महत्वाचा खुलासा' असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच त्यासोबत व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या यादीचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे.


पाहा व्हिडीओ : coronavirus | मुंबईत लोकल आणि रस्ते वाहतुकीवर 'कोरोना' चा काय परिणाम?



दरम्यान, काही दिवसांपूर्वी चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो ही अफवाही पसरवण्यात आली होती. या अफवेमुळे पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्यामुळे याप्रकरणाची गंभीर दखल सरकारकडून घेण्यात आली होती. सोशल मीडियावर चुकीची माहिती अर्थात अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारच्यावतीने सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना या अफवेमुळे पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याने गुन्हा दाखल केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली होती.


संबंधित बातम्या :


Coronavirus | मुंबईतल्या डॉक्टरांच्या टीमचा अनोखा उपक्रम, कोरोनाबाबत फोनवरुन मोफत सल्ला


Coronavirus | मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार : राजेश टोपे


Coronavirus | असंवेदनशीलता... रुग्णालयात कोरोनाचे पेशंट असल्याने विष प्यायलेल्या तरुणाला उपचारासाठी नेण्यास नकार, तरुणाचा उपचाराविना मृत्यू


Coronavirus | कोरोनोमुळे मध्य रेल्वेच्या 23 तर पश्चिम रेल्वेच्या 10 गाड्या रद्द