CORONAVIRUS UPDATES | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Mar 2020 10:34 PM
'कोरोना’चा सामना करण्यासाठी सर्वजण सज्ज असतानाच औरंगाबादेत ‘स्वाईन फ्लू’ने शिरकाव केल्याचे समोर आले आहे़ कोरोनाच्या संशयावरून घेतलेल्या दोघांचे अहवाल ‘स्वाईन फ्लू’ पॉझिटिव्ह निघाले आहे़ कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिका निगेटिव्ह झाल्याचा आनंदोत्सव साजरा होतानाच हा प्रकार समोर आला आहे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध येणार आहे.
अत्यावश्यक सेवेशी संबंधित नसणाऱ्यांना उद्या रेल्वे स्टेशनवर प्रवेशच मिळणार नाही, सर्वांना शासकीय किंवा अत्यावश्यक सेवेशी संबंधित असल्याचं ओळखपत्र पाहूनच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार, लोकलमधून प्रवास करता येणार!
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात येणार्या वाहनांची नाकाबंदी करून तपासणी करण्यासाठी सातार्डा येथे तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. सदर पथकामधे वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. परंतू सदर वैद्यकीय अधिकारी हे विनापरवानगी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
जे सरकारी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत, अशांची आम्ही माहिती घेत आहोत. त्यामुळे वेळ पडल्यास त्यांनाही बोलवण्यात येईल : दीपक म्हैसकर
गोवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत त्यात सहभागी होऊन कोरोनाला पराभूत करूया, असे आवाहन पणजीचे महापौर उदय मडकईकर आणि आयुक्त संजीत रॉड्रिग्स यांनी केले. पणजी मार्केट आज मध्यरात्री पासून बंद केले जाणार असून मनपाचे स्वच्छता दूत जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होणार असल्याने उद्या घराघरातील कचरा उचल होणार नाही, लोकांनी एक दिवस कचरा व्यवस्थित ठेवावा आमचे स्वच्छता दूत सोमवारी दुपारी या कचऱ्याची उचल करतील, असे आवाहन महापौर मडकईकर आणि रॉड्रिग्स यांनी केले. सोमवारी राजधानी मधील धार्मिक स्थळांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात धार्मिक स्थळे बंद ठेवून गर्दी टाळण्याचे आवाहन केले जाणार,असल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली.
लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
,
उद्यापासून सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करणार
चंद्रपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन घेणार पोलीस कारवाईचा आधार. चंद्रपूरमध्ये पुण्याहून आलेल्या 1085 रेल्वे प्रवाशांना केले होम क्वारंटाईन, आतापर्यंत परदेशातून आलेले 40 नागरिक निगराणीमध्ये आहेत आणि शनिवारी आणखी 7 विदेशातून चंद्रपुरात आलेले नागरिक निगरणीत आहे. या सर्वांनी होम कॉरेन्टाईन न पाळल्यास कलम 188 सीआरपीसी व आयपीसीच्या 269/270 कलमान्वये प्रशासन कारवाई करणार
नागपूर :


• उद्या रविवार २२ मार्च २०२० रोजी नागपूर मेट्रो सेवा पूर्णपणे बंद,

• तर सोमवार पासून सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ७ दरम्यानच मेट्रो सेवा उपलब्ध राहील
मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन
जनता कर्फ्यूच्या दिवशी नागरिकांनी घराबाहेर पडू नये . घरातच थांबावे . जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा यासाठी धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शनिवारी रात्री धुळे शहरातील काही भागात जाऊन तेथील नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या सूचना केल्यात .
पालघर जिल्ह्यात लॉक डाऊन लागू असताना आज मात्र संध्याकाळी चिंचणी बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. आपत्ती व्यवस्थापन कडून स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यस्थळीच राहण्याचे आदेश असतानाही ह्या भागातील ग्रामविकास अधिकारी, तलाठी, स्थानिक पोलीस यंत्रणा यांचे मोठे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काय बंद करायचं? यासाठी वर्गीकरण करत आहोत. आयटी कंपनीशी सरकारमधील अनेक संस्था निगडीत आहे. त्यामुळे त्याविषयी निर्णय घेण्यासाठी आम्ही वर्गीकरण करत आहोत : दीपक म्हैसकर
कोरोना व्हायरसचा (कोविड-19) प्रकोप बघता महामेट्रो रविवार 22 मार्चला मेट्रो सेवा बंद ठेवणार आहे. महा मेट्रोद्वारे कोरोना वायरसचा प्रसार थांबविण्याकरिता अनेक प्रयत्न सुरु असून त्याच अनुषंगाने 23 मार्चपासून मेट्रो सेवा सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळे दरम्यान उपलब्ध राहील. याआधी घोषित केल्याप्रमाणे मेट्रो ट्रेनच्या फेऱ्या दर 30 मिनिटांनी उपलब्ध आहेत. सदर निर्णय अनावश्यक प्रवास टाळण्याकरिता घेतला असून महा मेट्रोने प्रवाश्यांना आवाहन केले आहे कि आवश्यक असेल तरच मेट्रो सेवेचा उपयोग करावा.
प्रकार जावडेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आमच्याशी चर्चा केली. त्यांनाही आम्ही आम्हाला कशाची गरज आहे, हे सांगितले. रक्त पेढ्यांमध्ये सध्या रक्ताची गरज आहे. त्यामुळे ब्लड बँकांना रक्त दानाची प्रक्रिच्या सूचना केल्या आहेत. मात्र, ही गोष्ट नियमात करण्याच्याही सूचना दिल्या आहेत : दीपक म्हैसकर
पंतप्रधान मोदी यांच्या काल व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा, राज्य सरकारकडून काय उपयायोजना करत आहे, याची माहिती मोदींनी घेतली. : दीपक म्हैसकर
मशिदीच्या भोंग्यातून आजवर तुम्ही अजान ऐकली असेल पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याच भोंग्यातून आता जनजागृतीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'जनता कर्फ्युचा' संदेश दिला जातोय. पिंपरी चिंचवडच्या देहूरोड येथील मुस्लिम बांधवांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केलाय. जामहा मशिदीतून अजान आणि नमाज पठण पूर्वी हे समाजहित जपलं जातंय. याचं अनुकरण राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक मशिदीत करण्याची गरज आहे.
LIVE UDPATE | गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या वसुंधराराजे आणि दुष्यंत सिंह यांना कोरोनाची लागण नाही, दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह
CSMT स्थानकात लांबच्या पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी हातावर होम कॉरंटाईन स्टॅम्प असलेल्या 16 जणांना रेल्वेने थांबवलं, त्यांना वरळीला कॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवलं
कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर दहावीचा एका विषयाचा पेपर आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, सोमवारी होणारा पेपर आता थेट 31 मार्च नंतर होणार,31 मार्चनंतर परीक्षा पेपरची तारीख जाहीर होणार; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर उद्या दिवसभर मुंबई मेट्रोची सेवा बंद राहणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्युचं आवाहन
नाशिक जिल्ह्यातील दारु विक्री बंदचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, देशी, विदेशी दारू विक्री तसेच सर्व बार आज संध्याकाळी 6 वाजेपासून होणार बंद, आदेश न पाळल्यास परवाना होणार रद्द
उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार, मॉल तसेच शहरातील डी-मार्ट बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून डी मार्टच्या दोघा मॅनेजर विरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्या भारतात 'जनता कर्फ्यु' , सर्वांनी याचं पालन करावं : आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, केंद्रानं आर्थिक मदत करावी : आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर, एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्ण आढळले
पुणे: परदेशात प्रवास न करूनही पुण्यातील एका महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सिंहगड रस्ता भागात राहणारी ही 41 वर्षांची महिला उपचारांसाठी कात्रज भागातील भारती हॉस्पिटलमध्ये 16 मार्च पासून भरती आहे . तिची तब्येत खराब झाल्याने डॉक्टरांनी तिचे स्वॅब टेस्टिंगसाठी एनआयव्हीकडे पाठवले असता ते पॉझिटीव्ह आले आहेत. या महिलेने ओला कारमधून प्रवास केला होता आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला ती वाशीमधे एका लग्नकार्यालयातही उपस्थित होती. ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती याची माहिती प्रशासनाकडून घेतली जातेय तर भारती हॉस्पिटल मध्येउपचार सुरू असताना तब्येत खालावल्याने या महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
250 आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था : आरोग्यमंत्री राजेश टोपे
पुणे शहर आणि जिल्ह्याकरीता 2800 अतिरिक्त होमगार्ड पुरवले जाणार. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होमगार्डची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर होमगार्ड विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सदानंद वायसे पाटील यांनी 2800 होमगार्ड पुरवण्याचे आदेश दिले.
रेस्टॉरंट्स, बँकिंग, शेअर बाजार सुरु राहणार : राजेश टोपे
कोरोना संशयित रुग्णांना घरातच रहा असा सल्ला सरकार आणि प्रशासन करीत असताना देखील अनेक स्थानबद्ध करण्यात आलेले रुग्ण विभागात खुले आम फिरत आहेत. अशाचप्रकारे धारावीमध्ये दुबईवरून आलेल्या एका 43 वर्षीय अलगीकरण करण्यात आलेला रुग्ण ज्याच्या हातावर कोरंटाईनचा स्टँप मारण्यात आला होता. तो खुले आम फिरत होता. याची माहिती स्थानिकांनी नियंत्रण कक्षाला दिली होती. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि त्याला सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शासकीय कार्यालयात एसी वापरू नये, जमल्यास कमीत कमी वापर करावा, राज्य सरकारचं परिपत्रक, थंड वातावरणात हा व्हायरस जास्त काळ राहतो म्हणून खबरदारी घेण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
कोरोना व्हायरसच्या भीतीने राज्याच्या बाहेरून आलेले कामगार आता मुंबई सोडून आपल्या गावी मोठ्या संख्येने जात आहेत. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हजारोंच्या संख्येने प्रवासी राज्याबाहेर जाण्यासाठी गर्दी करीत आहेत. गर्दी टाळा असे सरकार कडून सांगितले जात आहे. परंतु लोकमान्य टिळक टर्मिनस वर मात्र प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते. तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा आहेत. तर रेल्वे फलाटवर, प्रतिक्षालयात प्रचंड प्रवाश्यांची गर्दी होत आहे. अनेक प्रवासी रेल्वेत चढण्यासाठी एकच घाई करताना दिसत आहेत. यामुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची मोठी शक्यता आहे.
आपण सध्या स्टेज 2 मध्येच आहोत. 63 पैकी 12 ते 14 जणांना संसर्गातून कोरोनाची लागण, तर उर्वरित कोरोनाबाधित हे परदेशातून आले आहेत : आरोग्यमंत्री राजेश टोपे
जनतेने सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळावा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
लोकल ट्रेनही बंद करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मत : आरोग्यमंत्री राजेश टोपे
पुण्यात आणखी एकाला कोरोनाची लागण, मुंबईत 10 तर पुण्यात एक अशा 11 रूग्णांची राज्यात वाढ, महाराष्ट्रची संख्या 63 वर : आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबईत 10 जणांना कोरोनाची लागण, विदेशातून आलेले 8 रूग्ण तर संसर्गातून तिघांना लागण : आरोग्यमंत्री राजेश टोपे

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...


 


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासोबतच औरंगाबाद, ठाणे, बीडसह अन्य काही जिल्हे उद्या बंद राहणार आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी आणि खासगी दुकाने, आस्थापने बंद राहणार आहेत. या सर्व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तर नागपूरमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. याकाळात नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती आता फक्त 25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, तसंच मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (20 मार्च) जाहीर केलं. रेल्वे, बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.


 


21 आणि 22 मार्चला बीड बंद 
कोरोना विषाणुचा संसर्ग (कोव्हीड-19) रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 21 आणि 22 मार्च रोजी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, नगरपालिका, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सर्व उपविभागीय अधिकारी, उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, सर्व तहसीलदार, सर्व संबंधीत नगरपालिका/नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी इ.ची असणार आहे. ह्या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


 


नागपूरमध्ये लॉकडाउन
कोरोना व्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी काही निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना काही अधिकार दिले आहेत त्या नुसार. शहरात नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडायचे आहे. सर्व खासगी कार्यालय बंद करायचे आहेत. फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. यात भाजीपाला, दूध, औषधी, पाणी, फूड होम डिलिव्हरी सुरू राहतील. नियम तोडल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. 1897 हा कायदा शहरात लागू झाला असून नागपुरात शहरात लोक डाऊन आहे.

ठाणे अत्यावश्यक सेवा वगळून पूर्णपणे बंद
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे जिल्ह्यात शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्रातील नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना अत्यावश्यक किराणा सामान ( GROCERY), दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तु व औषधालय (CHEMIST SHOP) वगळून 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.


 


औरंगाबाद शहर दोन दिवस बंद
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता, औरंगाबाद शहर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी घेतला आहे. उद्या आणि परवा संपूर्ण शहर बंद राहील त्यामुळे लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील उदय चौधरी यांनी केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवांना या बंदमधून सूट देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.