CORONAVIRUS UPDATES | कोरोनामुळे औरंगाबाद शहर शनिवार, रविवार असं दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Mar 2020 10:15 PM
नांदेड जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश, 21 ते 23 मार्च पर्यंत तातडीच्या सेवा आस्थापना वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच काढले आदेश
औरंगाबाद शहर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद शहर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी घेतला आहे. उद्या आणि परवा संपूर्ण शहर बंद राहील त्यामुळे लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील उदय चौधरी यांनी केला आहे.. केवळ अत्यावश्यक सेवांना या बंदमधून सूट देण्यात आली आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापुरात 100 ते 125 लोकांना घेऊन मशिदीत नमाज पठण करून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी केला गुन्हा दाखल.
कस्तुरबा रुग्णालयात घुशी आणि मांजरींचा वावर?

रूग्णांना पौष्टिक आहारही मिळत नसल्याचा आरोप

,मुंबईतील एका वकिलाची हायकोर्टात याचिका, सोमवारी तातडीने सुनावणी
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जे कर्मचारी काम करतायत त्यांना विश्रांती देणंही गरजेचं. त्यांना पर्यायी कर्मचारी दिले जातील : अजित पवार
नागपूर : कोरोना वायरसचा (कोविड-19) प्रकोप बघता व भारत सरकारच्या निर्देशानुसार ऑरेंज लाईन(सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन) आणि अँक्वा लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) दरम्यान मेट्रो सेवेतील वेळापत्रकात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
दिनांक 21 मार्च ते 31 मार्चपर्यत मेट्रो फेऱ्या आता दर 30 मिनिटांनी (संध्या दर 15 मिनिटांनी उपलब्ध) सकाळी 8 ते सायंकाळी 7 पर्यंत उपलब्ध राहील. तर, 22 मार्च (रविवार) मेट्रो प्रवासी सेवा बंद राहील. नागरिकांना होणाऱ्या गैरसोईसाठी दिलगीर आहोत.
सरकारी कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांसह कशी चालवता येतील यासाठी प्रयत्न चालू आहेत : अजित पवार
जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश झुगारुन पानटपऱ्या चालू ठेवल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात 14 जनांवर गुन्हे दाखल.

सोलापूर : कोरोनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, सोलापूर पोलीस आयुक्तलायच्या हद्दीत आतापर्यंत 38 गुन्हे तर ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत 10 गुन्हे दाखल, तंबाखु आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे, शुक्रवारची नमाज सामुदायिक पठण करणे, सोशल मीडियावर अफवा पसरवणे, मोठ्या संख्येत लोक जमवित लग्न कार्य, सामूहिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे
मुंबई येथे आज आढळून आलेल्या दोन रुग्णांमध्ये एका ३८ वर्षीय तरुणाने तुर्कस्थान येथे प्रवास केला असून ६२ वर्षीय व्यक्तीने (पुरुष) इंग्लंड येथे प्रवास केलेला आहे. तर पुण्यातील २० वर्षीय तरुणाने स्कॉटलंड येथून प्रवास केलेला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांवरून आता 25 टक्क्यांवर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही एक दिवस सुट्टी कशी करता येईल यासाठीही चर्चा सुरू आहे.
जिथं आवश्यक आहे तिथं सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येईल. मुंबईच नव्हे तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील असा निर्णय घेतला जाऊ शकतो : अजित पवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

#सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे.

#जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे. अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे.

#चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत. काल मी आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळतोय .

#पुढचे १५ -२० दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे.काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या.

#अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा. पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार?

#तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. यापूर्वी ५० टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता.

# बँका सुरूच राहतील.

#खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे.

#या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात.

#ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका.
विवाह, अंत्यविधीप्रसंगी होणारी गर्दी टाळली पाहीजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांच्या बाबतीत मालकांमी माणुसकीने वागून त्यांनी किमान वेतन देण्याची विनंती मी त्यांना करतो : अजित पवार
जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकानं बंद राहणार, लोकल आणि बसेसची सेवा बंद होणार नाही - मुख्यमंत्री
कोरोना व्हायरसच्या या संकटाविरोधात राज्य सरकार सगळ्या उपाययोजना करत आहेत. यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे : उपमुख्यमंत्री अजित पवार
आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, येणारा काळ कठीण आहे. गर्दी कमी झाली नाही तर बस आणि रेल्वे सेवाही बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल : अजित पवार
|मुंबई महानगर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसर, नागपूर या महानगरांतील जीवनावश्यक गोष्टींव्यतिरिक्त इतर सर्व सोयी आणि कार्यालयं बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
प्रत्येक राज्यात मेडिकल टीम पाठवल्या आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद सरु
कोरोनाच्याविरोधात जागतिक युद्ध सुरू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग शहरांमध्ये कुणालाही होऊ नये म्हणून आज यवतमाळ शहरातील संपूर्ण ऑटो चालकांना मोफत कापडी मास्क वाटप करण्यात आले. साधारण 1000 पेक्षा अधिक मास्क वाटप करण्यात आले आहे . ऑटोचालक हे बसस्थानक रेल्वेस्थानक या भागांमध्ये कार्यरत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तीशी संपर्क येतो, त्यामुळे त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. याच अनुषंगाने आज या सर्व आटो चालकांना आटो युनियनच्या माध्यमातून बस स्थानक परिसरामध्ये मोफत मास्क वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात रहावं लागत आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यंत्रमागाचे शहर असलेल्या मालेगाव शहरात कोरोनाचा इम्पॅक्ट दिसू लागला असून शहरातील तयार होणारे ग्रे कापड खरेदी करण व्यापा-यांनी बंद केल्याने त्याचा परिणाम यंत्र मागावर झालाय. त्यामुळे आधीच मंदीमुळे खालावलेल्या या व्यवसायाला कोरोनाचा फटका बसला आहे. तयार केलेला कापडच खरेदी करुन बाहेर जात नसल्याने हळी हळी यंत्रमागाची खडखडाट बंद होऊ लागलीय. येथिल तयार झालेला कापड व्यापारी खरेदी करुन तो राजस्थान, पाली, बालोतरा या ठिकाणी पाठवित असतात. मात्र, तिकडे सुध्दा कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने मालेगावातील व्यापा-यांनी कापड खरेदीच बंद केलीय,पर्यायाने तयार ग्रे कापडाच्या गाठी कारखानदारांकडे पडून आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण; मुख्यमंत्री महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता
पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
रत्नागिरी जिल्ह्यात दुबईहून आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. आता चक्क संबंधित रुग्णावर उपचार करणाऱ्या एक महिला वैद्यकीय अधिकारीही कोरोना संशयित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरचे सॅम्पल घेतले मात्र ते पुण्याला पाठवलेच नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सकांनी सॅम्पल पुण्याला पाठवले नाहीत, असा आरोप डॉक्टरने केला आहे. यानंतर डॉक्टरने स्वतःला क्वॉरन्टाईन करुन घेतलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक जीवाशी खेळत असल्याचंही डॉक्टरने म्हटलं आहे. महिला डॉक्टरने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली आहे .
तळेगाव टोल नाक्यावर पोलिसांकडून वाहनांची चौकशी, प्रवाशांच्या हातावरील क्वॉरंटाईन स्टॅम्पचीही पाहणी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर थर्मल चेकिंगसुद्धा केलं जाणार विभागीय आयुक्तांची माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर आतून-बाहेरून स्वच्छ करण्याचे काम सुरू झालेलं आहे. 70 हून अधिक कर्मचारी मंदिर स्वच्छ करण्याच्या कामात गुंग आहेत. वेगवेगळी केमिकल्स आणि पाण्याच्या मदतीने मंदिर स्वच्छ केलं जात आहे. ज्या ज्या ठिकाणी नागरिकांचा स्पर्श होत होता अशा सर्वच मंदिरातील ठिकणी सध्या स्वच्छ करण्याचे काम सुरू झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही कठोर पावलं उचलावी लागणार; दुपारी 12:30 वाजता निर्णय घेणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
दहावीचे उर्वरित पेपर वेळापत्रकानुसार होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
गर्दी कमी व्हावी म्हणून आम्ही साडे बारा दरम्यान फेसबुक लाईव्ह माध्यमातून पत्रकारांशी बोलणार, तेव्हा महत्वाचे निर्णय सांगणार आहोत : आरोग्यमंत्री राजेश टोपे
पंतप्रधान मोदींचं संपूर्ण भाषण ऐकलं 22 तारखेला कर्फ्यु असावा अशी अपेक्षा केली आहे, अगदी योग्य निर्णय घेण्यात आला आहे. लोकांना विनंती प्रतिसाद देऊन कर्फ्यु पाळला पाहिजे, हा संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे : आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नववी, अकरावीचे उर्वरित पेपर 15 एप्रिलनंतर होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
राज्यात डायग्नोस्टिक सेंटर आणि कोरोना किटची व्यवस्था वाढवणार, खाजगी रूग्णालयातही कोरंटाईनची व्यवस्था : आरोग्यमंत्री राजेश टोपे
प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून मदतीची अपेक्षा, प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून मदतीची अपेक्षा : आरोग्यमंत्री राजेश टोपे
आज दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी आहे. राज्यातील पाच कोरोनाग्रस्त बरे होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाली असून मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुशे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 52 वर गेली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना शंभर टक्के बरा होऊ शकतो : आरोग्यमंत्री राजेश टोपे
करोनाची लागण झालेल्या क्रिटिकल रूग्णांचा शंभर टक्के खर्च महाराष्ट्र शासन करत आहे
. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत क्रिटिकल केअर मध्ये लागणार खर्च देण्यात येत आहे. : आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाचा आजार बरा होतो, जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घरातच थांबावं; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद सुरू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांची पत्रकार परिषद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये होणारी एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी; आमदार कपिल पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये होणारी एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी; आमदार कपिल पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दादर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून 100 टक्के लॉकडाऊन,
गुढीपाडव्यालाही सर्व दुकानं बंदच राहणार, दादर व्यापारी संघटनेचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

तिरुपति मंदिर भाविकांसाठी बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय
रत्नागिरीतील कोरोना रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची माहिती, जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळून सर्व दुकाने आजपासून राहणार बंद राहणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ शासनाच्या माहितीवर विश्वास ठेवा, असं आवाहनही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलं आहे. तसेच कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचंही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं आहे.

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...


 


नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.

मोदी सुरुवातीला म्हणाले की, मी भारतीयांकडे काहीतरी मागायला आलो आहे. अद्याप करोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसंच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासियांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. जगातल्या ज्या देशांमध्ये करोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक करोनाचं संकट गहिरं झालं आहे. करोनाग्रस्तांची संख्या त्या देशांमध्ये वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटींच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करु, असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, मागच्या दोन महिन्यांपासून आपण कोरोनाबाबत विविध बातम्या ऐकतो आहोत आणि पाहतो आहोत. भारतीयांनी कोरोनाचा प्रभावीपणे सामना केला याचं मला कौतुक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून असं वातावरण तयार झालं की आपण संकटापासून आपण सध्या वाचलो आहोत. सगळं काही ठीक आहे मात्र जागतिक महामारी असलेल्या कोरोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहणं आवश्यक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.