- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
coronavirus LIVE UPDATES | ठाण्यात एका दिवसात 3 नवे कोरोना बाधित रुग्ण, ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या 16 वर
coronavirus LIVE UPDATES | ठाण्यात एका दिवसात 3 नवे कोरोना बाधित रुग्ण, ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या 16 वर
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील अडीच हजाराच्या वर आकडा गाठला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
03 Apr 2020 09:32 PM
कल्याण शहरात आढळलेला कोरोनाचा पहिला रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. या रुग्णाला नुकताच मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. या रुग्णामुळे त्याची पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांवर सुरुवातीला मुंबईच्या कस्तुरबा आणि नंतर जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यात हे तिघेही पूर्णपणे वर झाले असून त्यांना नुकताच डिस्चार्जही देण्यात आला आहे.
पुणे : इंदापुरात लॉकडाऊनचे पालन न केल्याने न्यायालयाची सहा जणांना शिक्षा, अनेकांवर गुन्हे दाखल त्यापैकी आज न्यायालयाची सहा जणांना शिक्षा, या सर्व आरोपींना तीन दिवस कैद किंवा 1500 रुपये दंडाची शिक्षा
ठाण्यात एका दिवसात 3 नवे कोरोना बाधित रुग्ण, मुंब्रा, धोबी आळी आणि लोढा पॅरेडाइज येथे प्रत्येकी एक रुग्ण, रुग्णांची पार्श्वभूमी तपासण्याचे काम सुरू, काल दोन रुग्ण आढळले होते, ठाण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 वर
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा रुग्ण निजामुद्दीन मर्कज येथून आलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातील आहे. हा रुग्ण मशिदीत राहिलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेला आहे. शहरातील आकडा आता 15 वर पोहचला आहे.
कल्याण शहरात आढळलेला कोरोनाचा पहिला रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. या रुग्णाला नुकताच मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. कोरोना बाधित रुग्ण हा सहा मार्चला अमेरिकेहून आला होता. त्यानंतर त्याने सोलापूरलाही प्रवास करत एका समारंभाला हजेरी लावली. मात्र, काही दिवसांनी त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांवर सुरुवातीला मुंबईच्या कस्तुरबा आणि नंतर जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यात हे तिघेही पूर्णपणे वर झाले असून त्यांना नुकताच डिस्चार्जही देण्यात आला आहे.
इंदापूरात लॉकडाऊनचे पालन न केल्याने न्यायालयाने सहा जणांना केली शिक्षा. इंदापूर तालुक्यात लॉकडाऊनचे पालन न केल्यामुळे बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल होते. त्यापैकी आज न्यायालयाने सहा जणांना दिली शिक्षा. या सर्व आरोपींना प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा 1500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच बारामतीत अशीच तिघांना झाली होती शिक्षा.
करोना व्हायरसमुळेउद्भवलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीउपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांचेसह विविध राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपालव केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांचेसोबत आज (दि. ३) दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. करोना व्हायरस उद्रेकामुळेउद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासंबंधी राज्य आणि केंद्र शासनातर्फे केल्या जातअसलेल्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. या चर्चेमध्ये राज्यपालभगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन, मुंबई येथून सहभाग घेतला. यापूर्वी राष्ट्रपतींनीदिनांक २७ मार्च रोजी सर्व राज्यपालांशी चर्चा केली होती.
कराड येथील एका घरात 23 जण नमाज पठण करताना सापडले. यातील 11 जण अल्पवयीन आहेत. 12 जणांना न्यायालयाकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद.
कराड येथील एका घरात 23 जण नमाज पठण करताना सापडले. यातील 11 जण अल्पवयीन आहेत. 12 जणांना न्यायालयाकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद.
देशभरात रविवारी एक तास आधी लोड शेडींग करण्याचा विचार; उद्याउर्जा मंत्री अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बोलणार. आठ वाजता लोडशेडींग सूरू होईल. टप्प्या टप्प्यांने. त्यामुळे नऊ वाजता विजेची मागणी कमी असेल. ते नऊ मिनिटे संपली की मग पुन्हा टप्प्या टप्प्याने वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गातील वैभववाडीमध्ये होम क्वॉरंटाईन केलेल्या व्यक्तीला शिवभोजन केंद्र चालवण्याची परवानगी, प्रकार समोर आल्यानंतर नगरसेवक आक्रमक, शिवभोजन केंद्र तात्काळ सील करण्याची मागणी
आज दिवसभर लातूर शहरात प्रचंड उकाडा वाढला होता. मात्र, संध्याकाळी विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. लातूर शहर तसेच लातूर ग्रामीणमधील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. काही काळ शहरातील बऱ्याच भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
केंद्रीय सुरक्षा बलाच्या आणखी 6 जवांनाची टेस्ट पॉझिटिव्ह
अन्य जवान विलगीकरण कक्षात, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती
मुळात केंद्र सरकारने दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देणं चुकीचं होतं. जे गेले होते त्यांनी समोर येऊन आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे. कोरोना संकट दूर होईपर्यंत मुस्लिम समाजाने घरामध्ये नमाज पठाण केलं पाहिजे. मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन.
सांगलीकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी. सांगली जिल्ह्यातील 20 पैकी 10 जणांचे स्वाब रिपोर्ट निगेटिव्ह. आज शुक्रवार सायंकाळपर्यंत येणार उर्वरित 10 जणांचे स्वाब रिपोर्ट. दिल्लीमधील मरकज घटनेतील चारजण आणि सांगली-तासगावमधील इतर सहा संशयितही निगेटिव्ह. नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी दिली माहिती.
शेततळ्यात पडून दोन भावांचा मृत्यू, मालेगाव तालुक्यातील रामपूर येथील घटना. किशोर सोनवणे आणि मुरलीधर सोनवणे असे मृत भावांची नावे.
टाटा ट्रस्टकडून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या के. बी. भाभा रुग्णालयातील डॉक्टरांसाठी हॉटेल ताजमध्ये राहण्याची सुविधा.
वाशिम जिल्ह्यात आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
राज्यातील माजी आमदार देणार कोरोनाच्या प्रश्नावर लढण्यासाठी राज्य सरकारला एक महिन्याचं वेतन. माजी आमदारांची संघटना असलेल्या 'महाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वय समिती'चा निर्णय. राज्यात दोन्ही सभाग्रूहाचे 1500 माजी आमदार संघटनेचे सदस्य. मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करणार असल्याची समितीचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सुधाकर गणगणे यांची माहिती.
देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गावागावात संचारबंदी असल्यामुळे परिणामी सर्व कामे ठप्प पडली आहेत. मजुरीच्या भरवशावर असणारे कुटुंब अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कवाड ग्रामपंचायती आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश गुरव यांच्या वतीने तालुक्यातील आदिवासी पड्यावरील गरजू आणि गरीब कुटुंबातील नागरिकांवर उपासमारीची पाळी येऊ नये, यासाठी 10 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यात मास्क, सॅनिटायझर, तांदूळ, दाळ, तेल, कांदा, बटाटा, साखर, चहा पावडर, तिखट, मीठ, हळद, साबणाचा समावेश आहे. अन्नधान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्यात आलं. तसंच कोरोनापासून स्वत:चा बचाव कसा करायचा याबाबतही जनजागृती करण्यात आली आहे.
गडहिंग्लजमध्ये मशिदीत सामूहिक नमाज पठाणासाठी जमलेल्यांना घेतलं ताब्यात. मशिदीच्या समोरच्या दरवाजाला लावले होते कुलूप, मागील दरवाजाने प्रवेश केला. पोलिसांना माहिती मिळताच कारवाई केली. अनेकजण गेले पळून गेले तर उर्वरित नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
बीड जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. आतापर्यंत 40 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते हे सगळे निगेटिव्ह आले आहेत. रात्री उशिरा जिल्ह्यात नव्याने 18 जणांचे स्वॅब सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले. सध्या तरी या 18 जणांना विलगीकरण केले असून आज रात्रीपर्यंत रिपोर्ट येतील.
भारतीय रेल्वे आपल्या गाड्यांचे डबे आयसोलेशन वॉर्डमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये रुपांतरित करत आहे. संपूर्ण देशात 20 हजार डबे असे रुपांतरित करुन गरज पडल्यास त्याचा वापर कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांसाठी करण्यात येईल. त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या वेगवेगळ्या कारशेडमध्ये अशाप्रकारे डबे रुपांतरित करण्याचे काम सध्या सुरु आहे. पश्चिम रेल्वे 410 डबे हॉस्पिटलमध्ये रुपांतरित करुन देणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे. ही बाब जिल्हावासीय आणि जिल्हा प्रशासन यांना दिलासा देणारी आहे. यामुळे जिल्ह्याची पावलं कोरोनामुक्तच्या दिशेने सुरु झाली आहेत.
नाशिक शहरात धान्यसाठाचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. केवळ 20 टक्के व्यापाऱ्यांकडेच धान्यसाठा शिल्लक आहे. एकीकडे ग्राहकांच्या रांगा कमी होत नाही आणि दुसरीकडे शहरात धान्याचा पुरवठा होत नसल्याने तुटवडा जाणवत आहेत. शहरात होलसेल व्यापारी अडीचशेच्या आसपास आहे, तर 8 ते 10 हजार किरकोळ विक्रेते आहेत, मात्र या अनेक दुकानात खडखडाट दिसू लागला आहे. इतर राज्यातून आणि जिल्ह्यातील धान्याचे ट्रक शहरात येत नाहीत. शहरात इतरवेळी दिवसाला 25 ट्रक धान्य येत होतं आज तिथे केवळ 5 ट्रक धान्य मिळत आहे.
कोल्हापूरात चैत्र महिन्यात होणारा अंबाबाईचा भव्य रथोत्सव सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या आजारामुळे रथोत्सव सोहळा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ
आहे. दरवर्षी जोतिबाच्या यात्रेनंतर रथोत्सव सोहळा दुसऱ्या दिवशी असतो. रथोत्सव सोहळा पारंपरिक विधीमध्ये खंड पडू नये यासाठी कोणता पर्याय काढता येईल यावर दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.
5 एप्रिल रविवारी रात्री ९ वाजता घरातील लाईट बंद करुन दिवा, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट लावून दरवाजात किंवा बाल्कनीत ९ मिनिटं उभे राहा : पंतप्रधान
येत्या रविवारी रात्री 9 वाजता सर्वांनी 9 मिनिटांचा वेळ द्यावा : पंतप्रधान
येत्या रविवारी रात्री 9 वाजता सर्वांनी 9 मिनिटांचा वेळ द्यावा : पंतप्रधान
कोरोनाच्या अंधाराला दूर करून प्रकाश दाखवायचा : पंतप्रधान
लॉकडाऊन दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अडीच तासाचा अवधी देण्यात आला आहे. मात्र या काळामध्ये एका घरातील फक्त एकानेच घराबाहेर पडायचं असा आदेश असतानाही लोक सर्रास मोटरसायकलवर फिरताना पाहायला मिळत आहेत. अशाच लोकांच्या दुचाकी बीड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बीड शहरामध्ये जवळपास 400 दुचाकी वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सोडून इतर वाहनांना पेट्रोल बंदी सुद्धा करण्यात आली आहे. तरी सुद्धा लोक काही केल्या रस्त्यावर यायचं थांबत नाहीत आणि म्हणून आता पोलिसांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे.
सरकार आणि लोकांचा सामूहिक लढा : नरेंद्र मोदी
पुण्यात लॉक डाऊनच्या काळात ग्राहकांना लुटणाऱ्या पाच विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तीन किराणा दुकानदार, एक मेडिकल, एक गॅस एजन्सीचा समावेश आहे. सर्वजण जीवनावश्यक वस्तूची चढ्या दरानं विक्री करत होते. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. अजूनही छापासत्र सुरू असून कारवाईत वाढ होणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांंचं मोठं सहकार्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनामुळे सध्या आपत्कालीन यंत्रणा 24 तास काम करीत असताना लॉकडाऊनमुळे त्यांच्याही जेवणाखानाची आबाळ होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पंढरपूरमधून असाच एक देवदूत समोर आला असून या सर्व यंत्रणेला तो नाष्टा आणि दोन वेळच्या गरम जेवणाचे डबे मोफत पुरवीत आहे. पंढरपूरमधील डिव्हीपी उद्योग समूहाचे मालक यांनी त्यांच्या हॉटेल विठ्ठल कामतमधून ही सेवा देण्यास सुरुवात केली असून आपत्कालीन यंत्रणेतील डॉक्टर , नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस, होमगार्ड आणि यंत्रणेतील महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी येथे येऊन डबे घेऊन जातात. या सर्वांना सकाळी दहा पर्यंत चहा व नाष्टाचे पॅकेट येथे तयार असतात. यानंतर दुपारी बारा वाजलेपासून पोळी भाजी भात असे डबे तयार होतात. तर रात्री 8 वाजता रात्रीच्या जेवणाचा डबा तयार असतो. यासाठी हॉटेल च्या कर्मचाऱ्यांना मदतीला इतर उद्योगातील कामगारही दाखल झाल्याने अभिजित पाटील यांच्यावरील ताण कमी झाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून संपेपर्यंत ही सेवा पुरवण्याचा निश्चय अभिजित पाटील यांनी केला असून सध्या 30 हजार लोकांना पुरेल एवढे समान भरून ठेवले आहे. प्रसिद्धीपासून दूर राहत पाटील यांनी ही सेवा सुरू केली असून लॉकडाऊन लांबला तरी सोलापूर जिल्ह्याला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या या आपत्कालीन यंत्रणेतील देवदूताना काही कमी पडू देणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले . सध्या रोज दिड ते दोन हहर लोकांना जेवण देणारे पाटील लाखो रुपये खर्चून कोट्यवधींचे समाधान मिळवत आहेत.
देशव्यापी लॉकडाऊनचा आज नववा दिवस आहे. यादरम्यान तुम्ही दाखवलेली शिस्त आणि सेवाभाव अभूतपूर्व आहे. सरकार, प्रशासन आणि जनता ही परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करत आहे: पंतप्रधान
सांगोला तालुक्यातील घेरडी येथे संचारबंदीच्या काळात बंदी असलेली बैलगाडी शर्यत घेतली, या प्रकरणी आयोजकासह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
सांगली : सांगली मनपा आयुक्त, नगरसेवक आणि मनपा कर्मचाऱ्याकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन, कोरोना प्रतिबंधक औषध फवारणीचे वाहन आयुक्त नितीन कापडनीस स्वत: चालवून पाहत असताना काही उत्साही नगरसेवक आणि मनपा कर्मचाऱ्याकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे झाले उल्लंघन, या प्रकारावर सोशल माध्यमात टीकेचा भडीमार
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आलाय. दुपारपर्यंत दुसऱ्या नमुन्याचा हा रिपोर्ट अपेक्षित आहे. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. शहरात एकूण 14 पैकी 11 रुग्ण आधीच कोरोनामुक्त झालेत. हा रुग्ण फिलिपिन्सहून आलेल्या तरुणाचा भाऊ असून, तो त्याच्या संपर्कात आला होता. भावाचा काल डिस्चार्ज झाला आहे.
पार्श्वभूमी
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या 2543 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 50 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 171 लोक ठीक झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितलं की, 24 तासांमध्ये 400 हून अधिक कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तब्लिकी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमामुळे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कोरोनाबाबत सरकारकडून अनेक उपाययोजना
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गाबाने बुधवारी राज्यातील पोलीस आयुक्तांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. बैठकीमध्ये राज्यसरकारला दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा युद्धपातळीवर कॉन्टेक्ट ट्रेसिंग करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर वीजा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यां विरोधात करवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक 325 कोरोना बाधित आहेत. तर केरळमध्ये 265, तामिळनाडूमध्ये 234, दिल्लीमध्ये 123, उत्तरप्रदेशमध्ये 116, राजस्थानमध्ये 108, कर्नाटकात 105 प्रकरणं समोर आली आहेत. तसेच जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 8 लाखांच्या पार गेला आहे.
पाहा व्हिडीओ : राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची उत्तरे
तामिळनाडू : तब्लिकीच्या धार्मिक कार्यक्रमातून 110 संसर्गजन्य
दिल्लीमध्ये तब्लिकी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमातून तामिळनाडूमध्ये परतलेल्या 110 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. ज्यामुळे राज्यातील संसर्गजन्य लोकांची संख्या 234 वर पोहोचली आहे. तामिळनाडूमध्ये 515 लोकांची ओळख पटली असून ते सर्वजण निजामुद्दीन येथे पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. मीडियी रिपोर्ट्सनुसार, राज्यातील जवळपास 1500 लोक कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्यापैकी 1131 लोक राज्यात परतले आहेत.
एका आठवड्यात मृतांचा आकडा दुप्पट झाला; डब्ल्यूएचओ चिंतीत
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएचओ) ने बुधवारी सांगितलं की, कोरोना व्हायरसची महामारी संपूर्ण जगभरात पसरली असून सध्या वाढत चाललेल्या प्रादुर्भावामुळे ते चिंतीत आहेत. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेडरोस एडहानोम घेब्रेयासस यांनी सांगितलं की, 'मागील आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पुढिल काही दिवसांत संसर्ग झालेल्यांची संख्या 10 लाख आणि मृत्यू झालेल्यांची संख्या 50,000 होऊ शकते.'