पिंपरी चिंचवड : संचारबंदीची कारवाई करताना पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःचे टिकटॉक व्हिडीओ बनवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नंदकुमार कदम असं त्या टिकटॉक करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कारवाईदरम्यान खाकीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याकडून टिकटॉक केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कदम हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. संचारबंदी असताना बिनकामाचं बागडणाऱ्यांवर आणि दुकानं उघडून बसणाऱ्यांवर पोलिसांनी नक्कीच कारवाई करायला हवी. पण त्या कारवाईचा वापर टिकटॉक सारख्या सोशल मीडियावर टाकले जात आहेत. कारण त्यांनी स्वत: टिकटॉकचे हे व्हिडीओ समाजमाध्यमांत ही व्हायरल केले आहेत. पोलिसांनीच असे प्रताप केले तर मग सामान्यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय. टिकटॉकसाठी खाकीचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे.

कोरोनाबाबत गैरसमज पसरवणे नेटिझन्सला महागात

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावाने कोरोनाबाबत गैरसमज पसरवल्याने एका नेटिझन्सवर गुन्हा दाखल झाला आहे.. दीपक वाघ या व्यक्तीने फेसबुकवर एक कमेंट पेस्ट केली होती. 21 मार्चच्या या कमेंटमध्ये "आज रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत कोणीही घरा बाहेर पडू नये, कोविड-19 ला मारण्यासाठी संपूर्ण शहरातील परिसरात हवेत फवारणी केली जाणार आहे. ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवा, ही विनंती. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर." असं त्यात नमूद होतं. हा संदेश वाऱ्यासारखा शहरभर पसरला. पालिका प्रशासन, पोलीस आणि माध्यमांना याबाबत शहरवासीय विचारणा करू लागले. शेकडो फोन ना उत्तरं देता-देता यंत्रणा वैतागून गेली. यातून पालिका आयुक्तांची बदनामी झाली. त्यामुळे पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये तसा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळं दीपक वाघ या नेटिझन्सला कधी ही अटक होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊन वेळी घरात बसून नसत्या उठाठेव करू नका, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 116
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 झाली आहे. आज सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी 14 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
मुंबई शहर आणि उपनगर - 45
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 19
नवी मुंबई - 5
कल्याण - 5
नागपूर - 4
यवतमाळ - 4
सांगली - 9
अहमदनगर - 3
ठाणे - 3
सातारा - 2
पनवेल- 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी - 1
वसई-विरार - 1