मुंबई : सरकारी काम सहा महिने थांब.. अशी टीका तर नेहमीच होते. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना पाच दिवस आठवडा करण्याचा निर्णय केला तेव्हा देखील विविध स्तरातून टीका झाली होती. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांबाबत टीकेचा सूर हा कायम असतो. पण कोरोना सारख्या संकटाच्या वेळी जेव्हा संपूर्ण राज्य बंद करण्याची वेळ आली तेव्हा सरकारी रुग्णालय, जिल्हाधिकारी, तलाठी सर्वजण या संकटाच्या समयी काम करत आहे. संपूर्ण व्यवस्था नीट चालावी म्हणून हेच कर्मचारी झटत आहे. या कर्मचाऱ्यांना धन्यवाद करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक पत्र लिहिले. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना भावनिक साद घालत ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार त्यांनी या पत्राद्वारे मानले.


हे पत्र तलाठी ते मुख्य सचिव आणि कस्तुरबा रूग्णालयातील उच्च पदावर असणारा कर्माचारी ते गावातील छोट्या कर्मचाऱ्याला पत्र देण्यात येणार आहे. महसूल मंत्र्याच्या सहीने हे पत्र प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे.


नेमके काय लिहिले पत्र?


सप्रेम नमस्कार


गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा!


कोरोना विषाणूची धग महाराष्ट्रातही येऊन पोहोचली आहे, तुमची माझी चिंता वाढविणाऱ्या बातम्या सतत आपल्या कानावर येत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने पहिल्या दिवसापासून हे संकट गांभीर्याने घेतले. शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि अधिकारी, पोलिस बांधव, वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉय, फार्मासिस्ट, सपोर्ट स्टाफ आणि इतरही या लढाईत सामील असलेले असंख्य हात! आपण या लढाईतील खरेखुरे सैनिक आहात.


सण उत्सवांचा, कौटुंबिक सोहळ्याचा आणि आपल्या व्यक्तिगत सुटीचा विचार न करता महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी आपण जोखीम पत्करून काम करत आहात. महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक संकटाला आपण धीराने सामोरे जातात, धोका पत्करून जनतेच्या पाठीशी उभे राहतात! ही शासन व्यवस्था तुमच्यामुळेच आहे. मला ठाऊक आहे आपलेही कुटुंब काळजीत आहे. सततच्या बातम्या त्यांच्याही जीवाला घोर लावतात, मात्र तरीही ही लढाई लढावीच लागणार आहे. आपल्याशिवाय हे युद्ध जिंकणे शक्य नाही.


इतरांच्या आरोग्याची काळजी करतांना आपण स्वतःलाही जपावे. मास्कचा वापर करावा, सतत हात धुवावेत, सॅनिटायझरचा उपयोग करावा, बैठका-मदतकार्य करतांना 3 फूट अंतर ठेवावे, स्पर्श टाळावा आणि इतरही आवश्यक असलेली काळजी घ्यावी. महत्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबासोबतही संपर्क ठेवा! त्यांच्या चिंतेचे योग्य समाधान करा.


आरोग्य, पोलिस आणि महसूल विभागांसह इतरही सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी गेली आठ दिवस कोरोना विरोधातील लढाईत व्यग्र आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि त्यांची टीम, विभागीय आयुक्त दररोज उशिरापर्यंत मैदानात आहेत. या अनपेक्षित लढाईला यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व त्यांचे सर्व सहकारी हे अठरा अठरा तास व्यस्त आहेत. तलाठी समाजाला धीर देत आहेत, कोतवाल त्यांना मदत करत आहेत. तुम्ही घरदार सोडून राज्यासाठी दिवस रात्र एक करून काम करत आहात, त्याच कौतुक आहे.


केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे, या काळात आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. पुढचे काही दिवस जनतेला शांत आणि महाराष्ट्राला गतिमान ठेवण्याची भूमिका आपल्याला निभावावी लागणार आहे, आपण ती यशस्वी कराल याबद्दल मला खात्री आहे. ही लढाई आपल्या सर्वांची आहे, आज गुढीपाडव्याच्या दिवशीही आपण बाहेर आहात, तुमच्या या त्यागाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.


पुन्हा एकदा विनंती करतो, आपण आपलीही काळजी घ्या!


धन्यवाद!


बाळासाहेब थोरात


संबंधित बातम्या :