नाशिक : महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेली शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. आजपासून या योजनेअंतर्गत केवळ पाच रुपयात थाळी मिळणार असून ही थाळी मिळण्याची वेळ देखील वाढवली आहे. रोज 11 ते 3 या वेळेत ही थाळी आता 10 रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल, अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. आजपासून यावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. रोज एक लाख लोकांना ही थाळी देण्यात येईल असं भुजबळ म्हणाले. पुढील तीन महिने ही सवलत देण्यात आली असून यासाठी 160 कोटींचा कार्यक्रम आखला आहे. कोरोनामुळे ज्यांना अन्न मिळत नाही, बेघर आहेत त्यांना शिवभोजनमध्ये जेवण मिळणार असल्याचे ते म्हणाले.
त्यांनी सांगितलं की, या दरम्यान शिवभोजन थाळी केंद्रात रोज निर्जंतुकीकरण केले जाईल. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावे. मास्क आणि सॅनेटायझर आता अत्यावश्यक सेवेत आणले आहेत. त्यांनी सांगितलं की, स्वस्त धान्य दुकानात 2 महिन्याचे अधिकचे धान्य उपलब्ध आहे. 6 महीने पुरेल एवढे अन्न धान्य आपल्याकडे उपलब्ध आहे.
ते म्हणाले की, माझ्याकडे ज्या तक्रारी येत आहेत त्यावर काम सुरु आहे. अन्न धान्याची कुठेही वाहतूक अडवली जाणार नाही. कोणाची काही तक्रार असल्यास माझ्याशी किंवा माझ्या सहकाऱ्याशी संपर्क साधा, असं आवाहन त्यांनी केलं.
ते म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्ती, कामगार, मजूर, उद्योगधंदे, अर्थव्यवस्था, सरकार या सगळ्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. मात्र,आता कोरोना सोबतची लढाई जिंकणं सगळ्यात महत्वाचं आहे. कोरोनाची भीषणता भयानक आहे. लोकांनी नाशिकमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. गर्दी झालेली असेल तर पोलीस त्याबाबत तात्काळ कारवाई करत आहेत, असंही ते म्हणाले.
तेलाचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही
भुजबळ म्हणाले, भाजी घेण्यासाठी गर्दी करू नये. अंतरावर काढलेल्या चौकोनात उभं राहून भाजी घ्यावी. मास्क घालूनच भाजी घ्यायला या, असं ते म्हणाले. तेलाचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही. दुर्दैवाने काही लोकांच्या सवयी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार असून 7 वर्षाची शिक्षा आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला. खाद्यतेलाच्या दरात वाढ करण्याची गरज नाही. तेलाची आयात होणाऱ्या जहाजांना काही बंधने होती. 1 महिनाच तेल पुरेल अशी परिस्थिती होती. मात्र हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. तेल आता उपलब्ध होत असून तेलाची कमतरता भासणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी पाच रुपयांना, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
29 Mar 2020 12:48 PM (IST)
महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही दहा रुपयात मिळणारी थाळी 5 रुपयात मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -