मुंबई : जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून सरकारनं धाडसी निर्णय घेतला आहे. आता जीवनावश्यक वस्तुंची दुकानं 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही गोष्टी बघून मला धक्काच बसला. लोक जिथे अडकले आहेत. त्यांची व्यवस्था केली जात आहे. मात्र, काही जण ट्रक आणि टँकरमधून प्रवास करत आहे. गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालून अनधिकृत मार्गाने प्रवास करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कोरोनाचे संकट घराबाहेर पडल्यानंतर धोकादायक आहे. त्यामुळे घरात राहण महत्त्वाचं आहे. मात्र, घरात राहताना संकट आल्यासारखं राहू नका. हे संकट घरात येणार नाही. त्यामुळे जिथे आहात तिथे राहा. घरात आनंदी वातावरण ठेवा. आभाळ कोसळलेलं नाही, मात्र घराबाहेर पडाल तर कोसळेल. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ घरात राहणं गरजेचं आहे. विषाणूसाठी निगेटिव्ह आणि घरासाठी पॉझिटिव्ह राहा, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये. रुग्ण आढळल्यास सरकारी रुग्णालयात पाठवा. कोरोनाची लक्षणे असतील तर लपवू नका घाबरुन जाण्याचं कारण नाही, हा आजार पूर्णपणे बरा होतो. आपल्या समोर असणारे संकट मोठे आहे. त्यासाठी आपण सज्ज आहोत. फक्त सहकार्य करा आणि शिस्तीचे पालन करा. तसेच आपल्यासाठी अहोरात्र काम करण्याऱ्या पोलिसांशी विनाकारण वाद घालू नका. ते आपल्या रक्षणासाठी बाहेर आहेत. विनाकारण गर्दी करू नका.
राज्यातील शिवभोजन केंद्रे देखील तीन तास सुरू ठेवण्यात येणार आहे. शिर्डी संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 51 कोटी, तर सिद्धीविनायक संस्थांकडून 5 कोटींची मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले.