मुंबई : राज्यात आज कोरोना रुग्णसंख्यने उच्चांक गाठला आहे. राज्यात दिवसभरात तब्बल 8 हजार 139 नवे कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 223 मृत्यू मागील चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत. या संख्येमुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्येने आता दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आतापर्यंत 10 हजार 116 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 4 हजार 360 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2 लाख 46 हजार 600 इतकी झाली आहे. यापैकी 1 लाख 36 हजार 985 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला 99 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात 6 लाख 80 हजार 17 लोक होम क्वॉरंटाइन आहेत. तर 47 हजार 376 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत. आत्तापर्यंत 12 लाख 85 हजार 991 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी 2 लाख 46 हजार 600 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 55.55 टक्के इतके झाले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे महत्वाच्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेत ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या लॉकडाऊन लागू आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी याठिकाणी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू
ठाणे
सध्या सुरू असलेला लॉकडाऊन 19 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी घेतला आहे. आधी 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र इतका कालावधी पुरेसा नसून त्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता असल्याने आणखी 8 दिवस आता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या कालावधीत जास्तीत जास्त चाचण्या करणे आणि कॉन्टॅक्ट स्ट्रेसिंग वाढवणे हे दोन मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले.
पुणे, पिंपरी-चिंचवड
पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्यांना लागून असलेल्या गावांमधे 13 तारखेला मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल. पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीचा, पुणे कॅन्टेन्मेट आणि हवेली तालुक्यातील गावांचा यामधे समावेश होतो. हा लॉकडाऊन 10 दिवसांसाठी म्हणजे 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल. दहा दिवसांचा हा लॉकडाऊन पाच-पाच दिवसांच्या दोन टप्प्यांत असणार आहे.
औरंगाबाद
औरंगाबाद शहरातही कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 18 जुलैपर्यंत ही संचारबंदी असेल. संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. प्रत्येक चौकाचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
मीरा-भाईंदर
मीर भाईंदर महापालिका हद्दीत 18 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यापूर्वीचा लॉकडाऊन 10 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत होता. आता 11 जुलै ते 18 जुलैपर्यंत 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आधी 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू होता. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आता 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचे नियम पूर्वीप्रमाणेच असतील. अत्यावश्यक सेवांना परवानगी, किराणा, दारू दुकानं फक्त होम डिलिव्हरी सुरु राहील.
Coronavirus in Mumbai | मुंबईत महिन्याभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 टक्क्यांनी घसरला