मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. राज्यात आज 58 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर आज नवीन 39 हजार 624 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 29 लाख 05 हजार 721 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सद्यस्थिताला एकूण 6 लाख 12 हजार 070 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.21 टक्के झाले आहे. राज्यात आज 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.64 टक्के आहे. 


मुंबईत 9 हजार 925 रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात  9 हजार 925 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 79273 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 4 लाख 44 हजार 214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के झाला आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 87 हजार 443 आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 40 दिवस झाला आहे.


Maharashtra Lockdown: महत्वाची बातमी! एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही, मात्र... 


राज्यात पुढील 15 दिवसांसाठी कलम 144 लागू


राज्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची काल घोषणा केला आहे. आजपासूस पुढील 15 दिवस म्हणजे 1 मे पर्यंत राज्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. 


नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री


कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 'ब्रेक दि चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. निर्बधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.