कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याच्या शिरगावमध्ये 20 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. मात्र हा संसर्ग गावात आलेल्या जावयामुळे झाल्याचे समोर आले आहे. चार दिवसांपूर्वी शिरगाव याठिकाणी एक जावई भेटीसाठी आला. त्यांना त्रास होत असल्याचे समजल्यानंतर राधानगरी याठिकाणी स्वॅब देण्यात आले. अहवालामध्ये तो जावई कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यामुळे सगळ्या गावात तारांबळ उडाली.


संबंधित जावई हा कोल्हापूर या ठिकाणी सुरक्षारक्षकाचे काम करत असतो. चार दिवसांपूर्वी तो ड्युटी वरून सासरवाडीत पोहोचला होता. त्यावेळी त्याला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे जाणवू लागली. गावातल्याच एका खाजगी डॉक्टरांना आपली तब्येत दाखवली. मात्र फारसा फरक पडला नाही. त्यामुळे त्यांनी राधानगरी इथल्या कोरोना सेंटरमध्ये जाऊन स्वॅब दिला. त्यानंतर संबंधित जावई हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. हा जावई अनेकांच्या संपर्कात आल्याने सगळ्यांचे धाबे दणाणले.


प्रशासनाने या जावयाच्या संपर्कात आलेल्या सासुरवाडी आणि आसपासच्या 23 लोकांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी 20 जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. ज्या डॉक्टरांकडे हा जावई उपचार घेण्यासाठी गेला होता त्या डॉक्टरांच्या संपर्कात आणखी 50 जण असल्याचे समजते. गावात  कोरोनाग्रस्तांची वाढलेली संख्या विचारात घेऊन अधिकाऱ्यांनी नाकेबंदी केली आहे. तर गावातील दक्षता समितीकडून नागरिकांना विशेष सूचना दिल्या जात आहेत.


उद्यापासून लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता?

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज शेकडो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. उद्यापासून लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता येत असली तरी नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ज्या तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक आहे.. त्याठिकाणी नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. शिवाय थोडीशी जरी लक्षणे आढळली तरी त्वरित स्वब देऊन पुढील उपचार घ्यावेत, अशा पद्धतीच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.