बीड : बीडच्या अंबाजोगाईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यामधील धुसपूस चव्हाट्यावर आली आहे. अंबाजोगाई शिवसेना शहर आणि तालुका प्रमुखासह सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. अंबाजोगाईमधील शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या खाजगी स्मारकाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा चोरल्याची तक्रार केली आहे.


शिवाजी कुलकर्णी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8 वाजता ते बाळासाहेब ठाकरे यांच्या अनावरण न झालेल्या स्मारकाच्या सभागृहाचे शटर कुलूप लावून बंद करून घरी गेले होते. रात्री 11.23 वाजताच्या सुमारास विना क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून शिवसेना युवा शहर प्रमुख अक्षय भूमकर, शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, सुहास मोहिते आणि अन्य दोघे अनोळखी असे सहा जण स्मारकाच्या परिसरात आले.


विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यासोबतच इतरही अनोळखी इसम होते. त्यांनी सभागृहाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बाहेर येऊन एक सीसीटीव्ही कॅमेरा व एक नामफलक असा एकूण 10 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला व रिक्षात बसून पळून गेले.


शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी उपजिल्हा प्रमुखाच्या घराशेजारी असलेल्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह उपजिल्हा प्रमुखांच्या नावाचा फलक चोरी केला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात आजी-माजी तालुकाप्रमुखासह अन्य पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीतून झाल्याचं बोलले जात आहे.