लातूर : हरयाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथे गेल्या तीन महिन्यांपासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले 12 यात्रेकरू दोन एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत आढळून आले होते. या 12 जणांचे स्वब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. या कोवीड 19 पॉझिटिव्ह रुग्णांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महाविद्यालय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.


कोरोना विषाणूचा प्रसार आता शहरातून गावाकडे होताना दिसत आहे. याला कारणीभूत ठरतायेत ते म्हणजे प्रवासी. आतापर्यंत गावाकडे कोरोनाची बाधा झालेले हे सर्वजण परदेश किंवा देशातील मोठ्या शहरातून गावकडे आल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमध्ये आलेल्या 12 मुस्लीम यात्रेकरुंपैकी आठ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या आठ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून अन्य चार जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन याबाबत सविस्तर माहिती घेत आहे.


कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे


कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू
या सर्व यात्रेकरूंवर तसेच अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या यात्रेकरूंवर उपचार करताना पुरेशी काळजी घेण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत याची कुणालाही लागण होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आणि या सर्वांवर उपचार करून लॉकडाऊननंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. हे सर्व यात्रेकरू निलंगा येथील ज्या मशिदीत आढळले होते. तेथे ते कोणाच्या संपर्कात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या हरियाणा ते लातूर पर्यंतच्या प्रवासात कुठे आणि कुणाकुणाच्या संपर्कात आले, याचा शोध घेण्याचे काम राज्य सरकारतर्फे सुरू आहे. अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली आहे.



9 मिनिटं घरातील केवळ दिवेच बंद करायचे; केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचं स्पष्टीकरण 


कसा झाला प्रवास?
आंध्रप्रदेश येथील करनुल भागातील बाराजण हे जमातसाठी पंधरा डिसेंबरला निघाले होते. आंध्रप्रदेश आणि हरियाणा या राज्यात धार्मिक कामे केल्यानंतर ते करनुलकडे निघणार होते. त्यातच लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यांच्या रेल्वेचे तिकीट आरक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना काहीच करता आले नाही. हरियाणा येथील प्रशासनास कळवून त्यांनी पुढील प्रवास सुरु केला. तेथील तहसीलदार यांनी दिलेल्या पासवर खासगी गाडीतून मथुरा आग्रा, इंदोर, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर या मार्गे ते निलंगा येथे आले. निलंगा येथे एक एप्रिलला ते दाखल झाले. त्यांनी करनुलच्या वैद्यकीय सेंटरला जाण्यासाठी मदत करा असे प्रशासनास सांगितले. तूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्यातील आठ लोकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. सध्या ते सर्वजण निलंगा येथील मशिदीत आश्रयाला आहेत. याची माहिती प्रशासनस मिळताच त्यांनी या सर्वांची तपासणी केली होती. त्यांना निलंगा येथे उभे करण्यात आलेल्या विलगिकरण रुग्णालयात हलविण्यात आले होते.



85 टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणेच आढळत नाही
कोरोना विषाणूचा प्रसार आता वेगाने शहराकडून गावाकडे होताना दिसत आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 500 च्या पुढे गेला आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या विश्लेषणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत कोरोना संक्रमितांचा अभ्यास केला असता यातील 85 टक्के लोकांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळली नाहीत. विशेष म्हणजे आज लातूरमध्ये भरती करण्यात आलेल्या आठ जणांमध्येही कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.


CM Uddhav Thackeray | डॉक्टर, नर्सेससोबत गैरवर्तन कराल तर खबरदार : उद्धव ठाकरे