पंढरपूर : महापुराच्या संकटानंतर पंढरपुरात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. कारण गेल्या चार दिवसात रोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण येथे आढळू लागले आहे. कोरोना गेला गेला म्हणत बिनधास्तपणे वावरणाऱ्या पंढरपूरकरांना आता पुन्हा खबरदारी बाळगावी लागणार आहे.


गेल्या चार दिवसापासून नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांचे वाढते आकड्यांची प्रशासन धास्तावले आहे. गेल्या सहा महिन्यापासून पंढरपूर प[परिसरात कोरोनामुळे तब्बल 175 जणांना प्राण गमवावे लागले होते. गेल्या काही दिवसापूर्वी आलेल्या महापुराच्या संकटात अनेक नागरिकांना हलवून सुरक्षितस्थळी नेण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले होते. याचसोबत सध्या ऊस तोडणीसाठी टोळ्या पंढरपूर तालुक्यात आल्याने यांचाही संपर्क तालुक्यात वाढला आहे.


मात्र 25 ऑक्टोबर रोजी 12 एवढाच नवीन रुग्णांचा आकडा पुढच्या चार दिवसात 253 पर्यंत वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याउलट शहर आणि तालुक्यात बहुतांश नागरिक कोरोनाचे कोणतेच नियम पाळत नसल्याने चिंतेत वाढ झाली आहे. सध्या शहरात 12 ठिकाणी कोरोना चाचण्या सुरु असल्या तरी नागरिक याकडे पाठ फिरवत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.


काही नागरिक कोरोनाचे लक्षणे दिसत असूनही अंगावर काढत असल्याने वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत. यामुळेच अशा 58 कोरोनाग्रस्त नागरिकांचा 24 तासाच्या आतच मृत्यू झाल्याने पंढरपूरचा डेथ रेट जवळपास 3 टक्क्यापर्यंत पोचला आहे. यात चांगली बाब एवढीच की ठाकरे सरकारने अजून मंदिर खुले केले नसल्याने किमान पंढरपूर परिसरात या वाढू लागलेल्या कोरोनाचा धोका राज्यात इतर ठिकाणी पोचू शकला नाही.


पंढरपूर एकूण रुग्ण - 6055
बरे झालेले रुग्ण संख्या - 5439 (रिकव्हरी रेट - 90 टक्के)
उपचार घेणारे रुग्ण - 441
कोरोनाचे मृत्यू - 175 ( मृत्यू दर 2.9 टक्के)