Mumbai cruise drug case : मुंबई क्रूज प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. दररोज नवनवे आरोप आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पंच प्रभाकर साईल याने एनसीबीवर गंभीर आरोप करुन खळबळ उडवली होती. आता आणखी एका पंचानं क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीवर गंभीर आरोप करत खळबळ माजवली आहे. प्रभाकर साईलनंतर पंच सोनू म्हस्के यांनी एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप पंच सोनू म्हस्के यांनी केलाय. दुसऱ्या पंचाच्या आरोपानंतर एनसीबीच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.  


मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी सोनू म्हस्के यांवी विशेष न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये त्यांनी एनसीबीने कोरा कागद, सीलबंद लिफाफ्यावर सही करण्यास भाग पाडलं, असा गंभीर आरोप केलाय. सोनू म्हस्केंच्या या आरोपावर एनसीबी काय उत्तर देतेय, याकडे लक्ष लागलं आहे. 


सोनू म्हस्के यांना कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आरोपी अचीत कुमार यांच्या अटकेवेळी पंच करण्यात आलं होतं. सोनू म्हस्के यांनी मुंबईतील विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये सोनू म्हस्के यांनी असा आरोप केलाय की,  ‘कोऱ्या कागदावर सही करण्यास एनसीबीने भाग पाडलं. ज्यावेळी सही करण्यास विरोध केला तेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांनी कारवाईची धमकी दिली.  माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. काही पानावर हिंदीमध्ये लिहिलेलं होतं. मात्र मला हिंदी येत नाही, त्यामुळे मला काहीच समजलं नाही. ‘ 


प्रभाकर साईल यांनी NCB वर काय केले होते आरोप?
आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे.  एबीपी माझाशी बोलताना एनसीबी रेडचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितलं की, त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती. मात्र तो कागद कोरा होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवलं आणि त्यानंतर साईल यांनी गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं. साईल यांनी गोसावीचे चोरून लपून व्हिडीओ शूट केले. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावलं असं दिसतंय.  याच 25 कोटींची मागणी केली. त्यावर 18 कोटींवर डील झाली आणि मी ऐकलं त्यानुसार वानखेडेंना 8 कोटी द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं, असा दावा देखील साईल यांनी केला आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha