स्पर्धा अमेरिकेत, जल्लोषाचा गुलाल कोल्हापुरात! अर्जेंटिनाच्या विजयानंतर हलगीच्या तालावर कोल्हापूरकरांचा ठेका


कोल्हापूर : अर्जेंटिनाने कोपा अमेरिका 2021 चा किताब आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघानं आर्क रायवल्स ब्राझीलचा 1-0 नं पराभव केला. अर्जेंटीनाने जवळपास 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपलं नाव पटकावलं आहे. या विजयाचा जल्लोष तिकडं अर्जेंटिनामध्ये सुरु आहेच मात्र इकडं महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात देखील या विजयाचा जल्लोष सुरु झाला. 


कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम नव्यानं सांगायची गरज नाहीच. कोल्हापूर आणि फुटबॉल एक समीकरणच आहे. अर्जेंटीनाने कोपा अमेरिका 2021 चा किताब आपल्या नावे केल्यानंतर कोल्हापुरात जल्लोष सुरु झाला. कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झालं.  अर्जेंटिनाने सामना जिंकताच समर्थक खंडोबा तालीम मंडळाने मोठा जल्लोष केला. हलगीच्या तालावर फुटबॉलप्रेमींनी ठेका धरला. कोल्हापुरातील  खंडोबा तालीम अर्जेंटिना समर्थक आहे तर त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाटाकडील तालीम ब्राझीलची समर्थक आहे. 


Copa America 2021 final : तब्बल 28 वर्षांनी कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटीनाची विजयाला गवसणी, गतविजेत्या ब्राझीलला नमवलं


28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाचं नाव 
अर्जेंटीनाने जवळपास 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. यापूर्वी 1993 मध्ये अर्जेंटीनाने हा किताब आपल्या नावे केला होता. स्टार फुटबॉलर आणि अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात संघानं पहिल्यांदाच कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तसेच ही मेस्सीची पहिली आतंरराष्ट्रीय ट्रॉफी आहे. एंजल डि मारियाने 21व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल डागत संघाला विजय मिळवून दिला. 


1993 नंतर अर्जेंटीनाच्या संघानं 4 वेळा कोपा अमेरिकेचा अंतिम सामना जिंकला होता. तसेच एकदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही संघ पोहोचला होता. मेस्सीनं जिंकलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. तर ब्राझीलनं आतापर्यंत 9 वेळा कोपा अमेरिका स्पर्धेत विजय मिळवला आहे. ब्राझीलनं 2019 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. परंतु, यंदा कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना काहीसा खास ठरला. या अंतिम सामन्यात फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू एकाच मैदानात एकमेकांविरोधात खेळताना पाहण्याचं भाग्य या सामन्यात फुटबॉल प्रेमींना मिळालं. या सामन्यात मेस्सी आणि नेमार हे 2 फॉरवर्ड एकमेकांविरोधात मैदानावर उतरले होते.