नागपुरात निवडणुकीदरम्यान गाडीची तोडफोड, भाजप आमदारावर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 08 Jan 2017 01:04 PM (IST)
नागपूर : नगरपालिका निवडणुकीदरम्यान गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या विरोधात काटोल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर शिवागाळ, धमकावणे आणि तोडफोडीचे आरोप लावण्यात आले आहेत. आज सकाळी आमदार आशिष देशमुख यांनी प्रतिस्पर्धी पक्ष विदर्भ माझाच्या वाहनातून पैसे वाटले जात आहेत, असा आरोप करत देशमुखांनी गाडीवर दगड फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विदर्भ माझा पक्षाने पोलिसात तक्रार दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी आशिष देशमुख यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला आहे. भाजपचे प्रचार प्रमुख दिपक कोळी यांनी मात्र विदर्भ माझा पक्षाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या गाडीमध्ये चार लाख रुपये होते, असा आरोप भाजपने केला आहे. नागपूरच्या कोटोल येथे नगरपालिका निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटत असल्याच्या कारणावरुन वाद झाला. भाजप आणि विदर्भ माझा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन विदर्भ माझा पक्षाच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडण्यात आली. काटोलजवळील हेठी गावातील ही घटना आहे. नगरपरिषदांच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुका आज होणार असून त्यात नागपूरच्या 9 तर गोंदियातल्या 2 नगरपरिषदांचा समावेश आहे. या दरम्यान कार्यकर्त्यांचा वाद झाल्याचं समोर आलं आहे.