नवी दिल्ली: राज्यातील कारभारावर नाराज असलेल्या काँग्रेस आमदारांनी दिल्लीत सोनिया गांधी ( Sonia Gandhi) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान आमदारांनी आपल्या अनेक व्यथा हायकमांडसमोर मांडल्या आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बैठकीत आमदारांनी काँग्रेस मंत्र्यांबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. ही भेट सुमारे अर्धा तास चालली. राहुल गांधी आणि पक्षांचे इतर वरिष्ठ नेते महाराष्ट्रात येऊन प्रत्येक आमदारांसोबत चर्चा करणार असल्याचं हायकमांडने आश्वासन दिल्याचं समजतंय.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस प्रभारी, विधिमंडळ पक्षाचे नेते किंवा इतर कुठलेही ज्येष्ठ नेते नसताना आमदारांना दिलेली ही भेट राज्यातील काँग्रेस नेत्यांना मेसेज देणारी असल्याचं सांगण्यात येतंय. 


राज्यात खांदेपालट करण्याची गरज असून चांगले सक्षम चेहरे निवडावेत तरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा कॉंग्रेसला चांगले दिवस येतील असं आमदारांनी म्हटलं आहे. यावेळी विधानसभा अध्यक्षपदाचा विषयही निघाला असून तो विषय आपल्याला माहिती असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं. 


यावेळी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे, कुणाल पाटील, अमित झनक, राजेश राठोड, प्रज्ञा सातव, अभिजित वंजारी, विकास ठाकरे, पी एन पाटील, कैलास गोरंट्याल, अमीन पटेल, काँग्रेस खासदार सुरेश धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा पाटील हे सर्वजण या बैठकीसाठी उपस्थित होते. 


काँग्रेस नेत्यांनी काय तक्रार केली? 
पक्ष सत्तेत आल्यानंतर संघटनेकडे नेत्यांचं दुर्लक्ष झालं आहे. प्रत्येक मंत्र्यांनी कांग्रेस आमदारांची दर महिन्याला बैठक घेतली पाहिजे. 
ज्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स नाही त्यांची खाती बदलली पाहिजेत. 
आमदार आणि पक्षांच्या पदाधिकारी यांची काम मंत्री करत नाही तर पक्ष वाढणार कसा?
महाविकास आघाडी सोबत पक्ष फरफटत चालला आहे. कोणीही भुमिका घेऊन विरोध करत नाही.
महामंडळाच वाटप लवकर झाल पाहिजे.
मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याच्या बाहेर दौरे करुन कार्यक्रम केले पाहिजेत.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


ABP Majha