मुंबई : नारायण राणेंनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र राणेंचे सर्व आरोप दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी फेटाळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकारिणी नियमानुसारच बरखास्त केल्याचं काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
राणे समर्थक असलेल्या सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी शनिवारी बरखास्त करण्यात आली. मात्र त्यानंतर राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसमध्ये आल्यापासून अशोक चव्हाण नेहमी कुरघोडीचं राजकारण करत असल्याचा घणाघात राणेंनी केला.
राणेंनी केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी नियमानुसार सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्त केल्याचं स्पष्ट केलं. तसंच या निर्णयाबाबत हायकमांडलाही माहिती असल्याचं दिल्लीतील नेत्यांनी स्पष्ट केलं.
काय आहे प्रकरण?
काँग्रेस कमिटीने नारायण राणे समर्थक दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करुन, पक्षाचे निष्ठावंत विकास सावंत यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली. त्यामुळे कोकणातील काँग्रेस म्हणजे आपणच अशा थाटात वावरणाऱ्या राणेंना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीनंतर एबीपी माझाशी बोलताना राणे म्हणाले की, नातवाच्या वाढदिवसादिवशी सीमोल्लंघन करत आहे. नवरात्रीत याचा शेवट करेन. सिंधुदुर्गात जाऊन पुढील रुपरेषा ठरवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तसेच कार्यकारिणी बरखास्तीवरुनही अशोक चव्हाणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राणे म्हणाले की, ‘’नांदेडमध्ये काँग्रेस संपली, आता राज्य काय सांभाळणार?’’ असा सवाल उपस्थीत केला आहे. तसेच काँग्रेसमध्ये आल्यापासून अशोक चव्हाण नेहमी कुरघोडीचं राजकारण करत आहेत,” असंही ते यावेळी म्हणाले.
कार्यकारिणी बरखास्तीचं खासदार हुसेन दलवाईंकडून समर्थन
सिंधुदुर्गमधील जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचं काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंनी समर्थन केलं आहे. तसंच हा निर्णय पूर्वीच घेतला गेला पाहिजे होता असंही दलवाईंनी म्हटलं आहे.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवरील आरोपांचाही दलवाईंनी राणेंचा समाचार घेतला आहे. सिंधुदुर्गातील राजकारण राणेंच्या हातात होतं, त्यांना काँग्रेसनं खूप मान-सन्मान दिला, मात्र त्यांनी पक्षासाठी काहीच केलं नसल्याचा आरोप दलवाईंनी केला.
नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, आमदारही आहेत, जे अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये पक्षासाठी करुन दाखवलं ते राणेंना सिंधुदुर्गात जमलं नसल्याचं दलवाईंनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
राणेंचे कुरघोडीचे सर्व आरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फेटाळले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2017 05:33 PM (IST)
नारायण राणेंनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र राणेंचे सर्व आरोप दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी फेटाळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकारिणी नियमानुसारच बरखास्त केल्याचं काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -