Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृ्त्वात 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाली. आज सकाळी महाराष्ट्रातील टप्प्याला (Bharat Jodo Yatra In Maharashtra) सुरुवात झाली. मात्र, या यात्रेवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे नेते, काँग्रेस सेवादलाचे समन्वयक कृष्णकुमार पांडे ह्यांचे देगलूरला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये 'भारत जोडो' यात्रेचा आज पहिला दिवस आहे. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास 'भारत जोडो' यात्रा वणाळी गुरुद्वारापासून नांदेडच्या दिशेने सुरू झाली. पदयात्रा मार्गक्रमण करत असताना सेवा दलाचे शेकडो कार्यकर्तेही यात सहभागी झाले होते. कृष्णकुमार पांडे हे झेंडा तुकडीच्या संचलनाचे प्रमुख होते. यात्रेत चालत असताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेने भारत जोडो यात्रेवर शोककळा पसरली. यात्रेच्या कॅम्पमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच. के. पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहली. श्रीकृष्ण पांडे हे नागपूर येथील आहेत. त्यांच्या निधनावर यात्रेत असलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात नांदेडमधील देगलूर येथे दाखल झाली आहे. यावेळी त्यांच्या सोबत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ज्यांच्या हातात मशाली होत्या. या यात्रेचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केले.
आज सकाळी 8.30 वाजल्यापासून राहुल गांधी यांची पदयात्रा देगलूर येथील गुरुद्वारापासून सुरू झाली. राज्यातल्या नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा अश्या 5 जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: