मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात पाऊल ठेवलं आणि 19 तारखेला राहुल गांधी महाराष्ट्र पालथा घालून मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहेत. पण या 12 दिवसांच्या यात्रेनंतर काँग्रेस नेत्यांनी मात्र सत्ताधाऱ्यांवर फिक्सिंगचा आरोप केला आहे. त्यांच्या मते ही यात्रा झाकोळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात विविध वादांना जन्म दिला. काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही हेच वाटतंय. भारत जोडो यात्रेच्या प्रत्येक दिवशी राज्यात काही ना काही वाद निर्माण झाल्याचं समोर आलं आहे.  


यात्रेचा पहिला दिवस- 7 नोव्हेंबर, अब्दुल सत्तारांची शिवीगाळ


राहुल गांधी यांच्या गेल्या दहा दिवसातील भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या आहेत. 7 नोव्हेंबर 2022 रोजी यात्रेचा पहिला दिवस होता. त्यावेळी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली आणि अख्खा दिवस त्याच बातमीने गाजला.


यात्रेचा दुसरा दिवस-7 नोव्हेंबर, 'हर हर महादेव'वरुन वाद


यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 'हर हर महादेव' महादेव या चित्रपटाला विरोध करत राष्ट्रवादीनं ठाण्यातला शो बंद पाडला आणि मग मनसेनं तोच शो पुन्हा सुरु केला. यावेळी भारत जोडो यात्रेवरचं लक्ष हटलं. 


यात्रेचा तिसरा दिवस- 9 नोव्हेंबर, संजय राऊत यांना जामीन 


तब्बल 103 दिवसांनंतर शिवसेनेच खासदार संजय राऊत तुरुगांतून बाहेर आले. त्यानंतर राज्यभरात त्याचं स्वागत करण्यात आलं आणि भारत जोडो यात्रा झाकोळली गेली.


यात्रेचा चौथा दिवस- 10 नोव्हेंबर, अफजलखान कबर


साताऱ्यातील प्रतापगडावर प्रशासनानं मोठी कारवाई केली आणि अफजलखानच्या कबरीजवळच अतिक्रमण हटवलं. त्यानंतर भारत जोडो यात्रेवरुन राज्याचं लक्ष प्रतापगडाकडे वेधलं गेलं.  


यात्रेचा पाचवा दिवस- 10 नोव्हेंबर, जितेंद्र आव्हाडांना अटक


ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये झालेल्या वादानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक झाली. त्या दिवशी दुपारनंतर सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा होती. त्यामुळे भारत जोडो यात्रेवरुन लक्ष हटलं. 


यात्रेचा सहावा दिवस-  11 नोव्हेंबर, आव्हाड जामीन


दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टानं जामीन दिला. पण त्याआधी मोठा राजकीय ड्रामा झाला आणि पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा उपेक्षित राहिली 


यात्रेचा सातवा दिवस-12 नोव्हेंबर, शिंदे, आव्हाड एकाच मंचावर


जामिनावर सुटल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील एकाच मंचावर दिसले. मुंब्र्यातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला एकत्र होते. त्यामुळे वादात असलेल्या आव्हाडांवरच कॅमेरे रोखले गेले आणि इथेच घडली दुसरी महत्वाची घटना. भाजपच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रिदा शेख यांनी आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार केली. त्याही दिवशी बातम्यांचा फोकस आव्हाड यांच्यावरच राहिला. 


यात्रेचा आठवा दिवस- 14 नोव्हेंबर, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, राजीनाम्याचा ट्वीट


रिदा रशिद यांच्या तक्रारीवरुन आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला खरा. पण आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा उपेक्षित राहिली 


राहुल गांधी महाराष्ट्रात सलग आठ दिवस चालत होते. पण त्यांच्या वेगापेक्षा महाराष्ट्रातल्या वादांचा वेग जास्त होता. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांना प्रश्न पडला आहे की भारत छोडो यात्रा झाकोळण्यासाठीच ही वादांची मालिका सुरु आहे का?