मुंबई: राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नियुक्ती संदर्भात पुन्हा एकदा काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती पोलिस महासंचालक पदी तात्पुरती दाखवली आहे. मात्र निवडणूक आयोगाने तात्पुरती नियुक्ती करा असे आदेश दिलेले नसल्याचं सांगत या नियुक्तीवरून काँग्रेस पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार  करणार आहे. काँग्रेसच्या तक्रारीवरून दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या पदावर संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  


निवडणूक काळात एवढ्या मोठ्या जबाबदार पदावरती तात्पुरती नियुक्ती करता येत नसल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे. त्यामुळे या नियुक्तीच्या विरोधात काँग्रेस पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.


शासन निर्णयात काय म्हटलंय? 


संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती ही विधानसभा निवडणूक होईपर्यंत करण्यात येत आहे. रश्मी शुक्ला यांना विधानसभा निवडणूक होईपर्यंत तात्पुरते सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत आहे. 


रश्मी शुक्ला सक्तीच्या रजेवर


मतदानाच्या 15 दिवस आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशांनंतर हा निर्णय घेण्यात आला. रश्मी शुक्ला या पक्षपाती असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला पत्र लिहित झारखंड, पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना हटवलं तर महाराष्ट्रात का कारवाई होत नाही असा सवाल केला होता.


रश्नी शुक्ला यांच्यावर 2019 सालच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणात आरोप झालेले असताना निवडणुकीदरम्यान त्यांना पोलीस महासंचालकपदी ठेवू नका, अशी मागणी महाविकास आघाडीनं केली होती. ती मागणी मान्य करत आयोगानं शुक्लांना पदमुक्त केलं. तसंच, शुक्ला यांची जबाबदारी राज्यातील सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे द्यावी असे आदेशही आयोगानं दिले. त्यानंतर राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांची पोलिस महासंचालक पदी नियुक्ती केली. पण त्यामध्ये तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आल्याने त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला.