उस्मानाबाद : महाराष्ट्रातील निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. युती आणि आघाड्यांच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रत्येकी 20-20 जागा लढवण्यावर जवळपास एकमत झालं आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 8 जागा सोडण्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीनं जवळपास निश्चित केलं आहे. त्यातील चार जागा काँग्रेस आणि चार जागा राष्ट्रवादीनं प्रकाश आंबेडकरांसाठी सोडण्यास तयारी दाखवली आहे.
महाराष्ट्राचा भौगोलिक आणि सामाजिक इतिहास हा गरीब मराठा, आदिवासी, ओबीसी, अनुसूचित जाती, बहुजन, मुस्लीम, धनगर समाजांची मोट बांधून सत्तेच्या टापूला धक्का देणारा आहे. हा वंचित समाज निर्णायक ठरु शकतो. याची पुरेपूर कल्पना प्रकाश आंबेडकर यांना आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा 2014 मध्ये 26:22 असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र हातकणंगलेमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारच न मिळाल्याने ती जागा अखेर काँगेसने लढवली होती. म्हणजेच गेल्या निवडणुकांत काँगेस 27 तर राष्ट्रवादी 21 जागांवर लढली होती. रायगड आणि हिंगोलीच्या जागांची तेव्हा अदलाबदल करण्यात आली होती.
बहुजन वंचित आघाडी आणि इतर मित्र पक्षांबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीची चर्चाही दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्यानंतर सुटेल की सुटल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे रंग भरले जातील.