चंद्रपूर : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर हे आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे (WhatsApp status) नेहमीच चर्चेत असतात. राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी गॅस सिलेंडरच्या दरांवर टीका करताना ठेवलेलं व्हॉट्सअॅप स्टेट्स पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
बाळू धानोरकर यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला फक्त एका सिलेंडरचा फोटो ठेवला होता. पण त्याखाली लिहिलेल्या ओळींकडे मात्र सगळ्यांच लक्ष वेधून घेतल. परिणामी त्यांचं हे व्हॉट्सअॅप स्टेटस एकदम चर्चेत आलं. "माझी किंमत फक्त 300 रुपये आहे पण बाकीचे 700रुपये तुमच्या मस्तीमुळे दाबलेल्या चुकीच्या बटणाचा दंड आहे," असं अगदी मर्म विनोदी वाक्य या सिलेंडर खाली लिहिलं आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करुन आणखी एक धक्का दिला. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेस सातत्याने आवाज बुलंद करत आहे, आंदोलनं करत आहे. खासदार बाळू धानोरकर देखील अशा आंदोलनांना अधूनमधून हजेरी लावतात. मात्र धानोरकर यांची खरी चर्चा आंदोलनापेक्षा ते व्हॉट्सअॅप स्टेटसवर कोणाची फिरकीफिरकी घेतात याचीच असते.
"घरी बायकोसोबत प्रेमाने वागा, बाहेर कोरोना वाढत आहे," असं एक भन्नाट बाळू स्टेट्स धानोरकर यांनी कोरोना महामारी दरम्यान ठेवलं होतं, त्याची देखील मोठी चर्चा झाली होती. "बायको घरी हिटलरच असते" असं सांगून त्यांनी एका भाषणात आपल्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर यांचीच फिरकी घेतली होती. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेत असताना आपल्या आक्रमक आंदोलनामुळे चर्चेत असलेले बाळू धानोरकर खासदार झाल्यानंतर आता आपल्या विनोद बुद्धीमुळे चर्चेत आहेत, असंच म्हणावं लागेल.
कोण आहेत बाळू धानोरकर?
बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार आहे. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दुसऱ्या मोदी लाटेत चंद्रपूर जिल्ह्यातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत केलं. काँग्रेसचे खासदार होण्यापूर्वी ते शिवसेनेचे आमदार होते
काँग्रेसचे आक्रमक खासदार म्हणून ओळख आहे. पण त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे त्यांचा मिश्किल स्वभावही पाहायला मिळत आहे.