अमरावती : गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मक विचार नाहीसे होतात, असं अजब विधान महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. तिवसा तालुक्यातील सार्शी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात यशोमती ठाकूर यांनी गाईवरुन अजब विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वीच यशोमती ठाकूर यांनी अजून खिसे गरम झाले नाही, असं विधान करुन वाद ओढावून घेतला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा त्यांनी अजब विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तिवसा तालुक्यातील सार्शी येथे गावाचे दैवतं समजल्या जाणाऱ्या एका मृत गाईच्या पुण्यतिथी निमित्ताने गावात सात दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. "आपण जे काम करतो, त्याला धर्म मानतो, आपण जो विचार करतो त्याला धर्म म्हणतो, सातत्याने विठ्ठलाचे नामस्मरण केले तर आपल्या आकांक्षा इच्छा पूर्ण होतात. मात्र, विठ्ठलाच्या पाया पडणे म्हणजे झालं असं नाही. आज तरुण युवकांना वेगवेगळ्या पदावर जायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, यासाठी आपण विठ्ठलाचे नामस्मरण केले पाहिजे", असा सल्ला यशोमती ठाकूर यांनी उपस्थितांना दिला.

यशोमती यांचा अजब दावा - 
पर्सनालिटी डेव्हलपमेंटचे खूप सारे कोर्स येत असून मोठे मोठे लोक त्याचं प्रशिक्षण घेतात. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही घेतला जातो. मात्र, यामुळे आपण आपली संस्कृती विसरतो. आपल्यात जे नकारात्मक विचार आहे, ते गाईच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरुन हात फिरविल्याने नाहीसे होतात. हा चमत्कार आहे, हे सर्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले असल्याचं अजब विधान यशोमती ठाकूर यांनी यावेळी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा आरोप होऊ लागला आहे.

यापूर्वीही वादात -
"आत्ताच शपथ घेतली, अजून खिसे गरम व्हायचे आहेत. जे लोक आता विरोधात आहेत, त्या जुन्या सत्ताधाऱ्यांकडे खूप पैसे आहेत. त्यांच्याकडून लक्ष्मीदर्शन होत असल्यास नाही म्हणू नका", असे वादग्रस्त विधान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. या विधानामुळे यशोमती ठाकूर यांच्यावर बरीच टीका झाली होती.

संबंधित बातमी - यशोमती ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य; निरुपम यांची टीका, तर सोमय्यांची तक्रार

CAA | काँग्रेसशासित राज्यांमधील विधिमंडळात सीएएविरोधात कायदेशीर ठराव मंजूर करणार | ABP Majha