नागपूर : गुंड मारत होते, मार खाणारे नागरिक संरक्षणासाठी पोलिसांना फोन करत होते आणि पोलिस पत्ता सापडत नाही म्हणून निवांत बसले होते.


 

 

नागपुरातील गुंडाराज फोफावत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. नागपुरमध्ये खडगाव रोडवरील ओम साई सृष्टी सोसायटीतील नागरिकांना काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. डीजेचा आवाज कमी करायला सांगितल्यामुळे ही मारहाण केली आहे. या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये काँग्रेसचा स्थानिक कार्यकर्ता रॉबिन शेलारे हा देखील उपस्थित असल्याचं बोललं जात आहे.

 

 

महिलांसह वृद्धांना अमानुष मारहाण

 

सोसायटीच्या बाजूला तिरुपती बालाजी मंगल कार्यालय आहे. मंगल कार्यालयात मध्यरात्रीही कर्कश आवाजात डीजे वाजत असल्यामुळे सोसायटीचे काही ज्येष्ठ नागरिक मंगल कार्यालयात विनंती करण्यासाठी गेले. मात्र या महाशयांचा पारा चढला आणि शाब्दिक वाद झाला. त्याचं रुपांतर मारहाणीत झालं.

 



 

 

मारहाणीनंतर नागरिकांनी पोलिसांना या सर्व प्रकाराची माहिती दिली. मात्र पत्ता माहित नसल्याचे कारण सांगून पोलिसांनी आपली जबाबदारी झटकली. पोलिसही सहकार्य करत नसल्याचे पाहून कार्यकर्त्यांच्या गुंडागर्दीला चांगलच बळ मिळालं.

 

 

पोलिसांनी प्रतिसाद न दिल्यामुळे 25 गुंडांनी सोसायीटीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. महिलांशी गैरवर्तन करत धुडगूस सुरु केला. फ्लॅटच्या दारावर लाथा मारुन सर्व नागरिकांना बाहेर काढलं. जो मिळेल त्याला लाकडाने आणि दगडाने मारहाण केली. यामध्ये 4 नागरिकांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून दिलीप शेंडे हे वृद्ध बेशुद्ध झाले होते, असं नागरिकांनी सांगितलं.

 

 

घटनेला पोलिसांचा निष्क्रियपणाच जबाबदार- नागरिक

 

मारहाण झाल्यानंतर नागरिकांनी त्वरित पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मात्र पोलिसांनी नागरिकांना पत्ता सापडत नसल्याचे कारण दिले. घटनेनंतर तब्बल एक तासाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांना प्रतिसाद न दिल्यामुळेच गुंडांना अभय मिळालं. त्यामुळे संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 



 

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटक केली असून त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेला काँग्रेस नेता रॉबिन शेलारे याला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणावर पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

 

 

ज्या पद्धतीने गुंडांनी घरात घुसून नागरिकांना मारहाण केली आणि पोलिसांनी घटनास्थळी जाण्यास दिरंगाई केली आहे, यावरुन नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारी का फोफावत आहे, हे स्पष्ट झालं आहे.