नागपूर : काँग्रेससाठी (Congress) आयुष्य अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेस विसरली आहे का?  नाना पटोले (Nana Patole)  पांडे कुटुंबाला दिलेल्या आर्थिक मदतीचा शब्द विसरले आहे का? असा सवाल  अनेक दशकांपर्यंत  काँग्रेसची सेवा करणाऱ्या आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra)  नांदेड मध्ये प्राणार्पण करणाऱ्या कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबीयांनी काँग्रेसला सवाल केला आहे.  नाना पटोले पांडे कुटुंबाला दिलेल्या आर्थिक मदतीचा शब्द विसरले आहे का? असा सवाल देखील कुटुंबीय विचारत आहे.  


मागील वर्षी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असता, पहिल्या दिवसापासूनच कृष्णकुमार पांडे यात्रेसोबत होते. पायी चालतानाच नांदेडमध्ये नोव्हेंबर 2022 रोजी त्यांचे निधन झाले होते. तेव्हा राहुल गांधींनी नागपुरात आल्यावर पांडे कुटुंबांचा सांत्वन करायला मी स्वतः जाईल असे सांगितले होते. तर भारत जोडो यात्रेच्या दरम्यान नांदेड मध्ये कृष्णकुमार पांडे यांच्या पार्थिवाला काँग्रेस।पक्षाकडून श्रद्धांजली वाहिली जात असताना नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाकडून पांडे कुटुंबाला पंचवीस लाख रुपये मदत म्हणून दिले जाईल असे जाहीर केल्याचा पांडे कुटुंबाचा दावा आहे. हे दोन्ही शब्द आजवर राहुल गांधी आणि नाना पटोले यांनी पाळलेले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने नागपुरात येत असलेले राहुल गांधी आणि त्यांच्या स्वागतासाठी तत्पर असलेले नाना पटोले आपला शब्द पूर्ण करतील अशी अपेक्षा पांडे कुटुंबाने व्यक्त केली आहे. 


आमची बदनामी करू नका, पांडे कुटुंबियांचे आवाहन


कृष्णकुमार पांडे यांचे 98 वर्षीय वडील आणि त्यांची विधवा पत्नी आजही पक्षासाठी बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्याची आठवण पक्ष नेतृत्वाला होईल आणि ते आमचं सांत्वन करायला घरी येतील अशी अपेक्षा आहे. पक्ष नेतृत्वाने तेव्हा जाहीर केलेली मदत दिली नाही तरी चालेल. मात्र आम्हाला मदत देण्यात आली आहे आणि आम्ही मदतीचे पैसे घेऊन ही खोटं बोलत आहोत अशी आमची बदनामी करू नका असे आवाहन  पांडे यांच्या पत्नीने केले आहे. 


काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात 'हैं तैयार हम' महारॅली


काँग्रेस पक्षाच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात काँग्रेसची "है तैयार हम" महारॅली होणार आहे. महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकणार आहे. सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी तसेच काँग्रेसशासित राज्यातील किमान तीन मुख्यमंत्री तसंच काँग्रेस कार्यसमितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता महारॅली सुरु होईल.