सांगली : सांगलीतील महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यावेळी काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतरही भाजपला मतदान होत असल्याचा संशय काँग्रेसकडून घेण्यात आला. यामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. तसंच काँग्रेसने काही काळासाठी मतदान प्रक्रियादेखील थांबवली.


काँग्रेससह इतर पक्षांनी मतदान प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर मतदान केंद्रावर दाखल झाले. चौकशीनंतर मतदानयंत्रात कोणताही घोळ नसल्याचं स्पष्टीकरण रवींद्र खेबुडकरांनी दिलं आहे.

काँग्रेस उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर धाव घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. गदारोळामुळे काही वेळासाठी प्रभाग क्रमांक 15 मधील मतदान प्रक्रिया ठप्प झाली.

आयुक्तांसह ,पोलीस अधिकऱ्यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. तसंच याबाबत तपासणी करत तसा कोणताही प्रकार नसल्याचा निर्वाळा दिला.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढत होत आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे नातेवाईक या प्रभागात भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे संजयकाका पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.