उस्मानाबाद : सरकारच्या विविध योजना आणि सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी आधारकार्ड सक्तीचं आहे. तसेच आता रेशनिंग दुकानातून केरोसिन मिळण्यासाठीही आधार नोंदणी सक्तीची असणार आहे. आजपासून महाराष्ट्रातल्या 88 लाख शिधापत्रिका धारकांना पीओएसमधूनच केरोसीन मिळणार आहे. आधार नसल्यास शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी बंधनकारक असणार आहे.


राज्य सरकारने पीओएस नावाची मशिन शिधावाटप दुकानदारांना दिली आहे. पीओएस मशिन शिधापत्रिका धारकांच्या आधारकार्डशी जोडलेली आहे. शिधापत्रिका धारकांना या मशिनद्वारेच धान्य मिळत आहे. राज्यात एकूण 88 लाख शिधापत्रिका धारकांना केरोसिन मिळतं. मात्र यातील अनेक जण केरोसिनचा गैरवापर करत होते किंवा घरात गॅस असूनही ते शिधावाटप दुकानातून केरोसिन घेत होते, असा संशय सरकारला होता.


केरोसिनचा गैरवापर कमी व्हावा यासाठी सरकारने 1 जून ते 31 जुलै दरम्यान प्रायोगिक पातळीवर पीओएसच्या माध्यमातून केरोसिन देण्याचा प्रयोग मुंबईत राबवला. यामध्ये केवळ मुंबईत जवळपास 30 टक्के केरोसिनची बचत झाल्याचे सरकारच्या लक्षात आले.


मुंबईतील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील 59 हजार 553 केरोसिन परवानाधारक वितरक आहेत, त्यांना आधार नोंदणी नसलेल्या शिधापत्रिका धारकांना केरोसिन वाटप न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. आधार नसल्यास ई-केवायसी बंधनकारक असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.


राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे पेट्रोलमध्ये भेसळ करण्यासाठी जे केरोसिन वापरलं जात होतं, त्यावर आळा बसू शकतो. तसेच केरोसिनची सबसिडीसाठी सरकारचा जो अतिरिक्त पैसा खर्च होत होता त्याची बचत होऊ शकते.