धुळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोरच कार्यकर्ते एकमेकात भिडले
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2016 03:31 PM (IST)
धुळे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोरच कार्यकर्त्यांची हाणामारी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. या घटनेनंतर काँग्रेसच्या शहराध्यक्ष यांच्यासह चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते प्रफुल पवार यांनी राजकारणाविषयी चर्चा केल्याने काँग्रेसचे शहर अध्यक्ष युवराज करनकाळ यांच्यासह चौघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याने मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी प्रफुल यांच्या तक्रारीवरुन शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांच्यासह चार जणांविरोधात शहर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोरच दोन गटात हणामारी झाल्याने काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.