मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. नाना पटोले आज अध्यक्षपदासाठी अर्ज भरतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. याआधी विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. परंतु अखेर नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दरम्यान अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोघेही पूर्ण कॅबिनेटच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे.


विधानसभेचं कामकाज उद्या (1 डिसेंबर) रविवारीही सुरु राहणार असून याच दिवशी अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

भाजप विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार!
तर दुसरीकडे भाजपनेही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचा अर्ज भरल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत किसन कथोरे यांचा 1 लाख 74 हजार 600 मतांनी विजय झाल्याचं त्यांनी सांगितलं.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम :
* विधानसभा अध्यक्षांची निवड 1 डिसेंबरला सकाळी 11 वाजता
* विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत आहे
* नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत
* नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत 1 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत

ठाकरे सरकारची आज बहुमत चाचणी
महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी आज (30 नोव्हेंबर) होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडीच्या सरकारला आजच बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आज दुपारी 2 वाजता विधानसभेचं कामकाज सुरु होईल. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बहुमत चाचणी पार पडणार आहे. आज कामकाज सुरु झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय देण्यात येणार आहे. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे.