जालना : देशाच्या भावनेला काँग्रेस-राष्ट्रवादी समजूनच घेत नाही. भारतात वेळेत ठरवलेल्या कामाला लोक प्रतिसाद देतात. सर्व देश काँग्रेसला पाहतोय, समजून घेतोय आणि संधी आली की जागा दाखवतोय. राष्ट्रहित, राष्ट्र सुरक्षा अशा मुद्द्यांवर सर्वांचा एकच सूर पाहिजे. जगाला आपला एकच आवाज ऐकायला गेला पाहिजे. मात्र राजकीय पोळी भाजणारे विरोधी ऐकायला तयार नाही, अशा शब्दात नरेंद मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जालन्यामध्ये बोलत होते.


... तर अतिरेक्यांना पुरलं तिथे चादर टाकायला जा


सर्जिकल स्ट्राईकला यांनी विरोध केला. कुणी देशभक्त सर्जिकल स्ट्राईकला विरोध करु शकतो का? कलम 370 हटवण्यास यांचा विरोध होता. कलम 370 वर एवढं प्रेम असेल तर, त्या अतिरेक्यांना जिथे पुरले तिथे चादर टाकायला जा, असं काँग्रेसला उद्देशून नरेंद्र मोदी म्हणाले. जनतेची भावना लक्षात न आल्याने ते उलटी भाषा बोलतात, असंही मोदींनी म्हटलं.


काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 10-10 जागा मिळतील


काँग्रेस आणि राष्ट्रवादीने खुप काळ दिल्ली, महाराष्ट्रात राज्य केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात निधी मराठवाड्यासाठी मंजूर होत होता, मात्र तो निधी काही निवडक चेल्या-चपाट्यांच्या विकासासाठी वापरला गेला. आघाडी सरकारच्या काळातील तीन मुख्यमंत्र्यांची तुलना भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांशी होईल. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 10-10 जागा मिळतील, असं भाकित मोदींनी केलं.


भारताला दुष्काळ मुक्त आणि जलयुक्त करण्याचे स्वप्न आम्ही पाहिले आहे. पाण्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करण्याचा प्लान आहे. गावातील पाण्याचे स्रोत पुर्नजीवित करण्याचा प्रयत्न करणार असून जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्रात जलक्रांती सुरु झाली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड हा याच जलक्रांतीचा एक भाग आहे. येणाऱ्या काळात येथील शेकडो गावांना पाणी उपलब्ध होईल, असा दावा मोदींनी व्यक्त केला.